हिंदीत मराठी कलाकारांना घाटी म्हणतात, आपल्याबद्दल त्यांना आकस; अभिनेता वैभव मांगलेंची फेसबुक पोस्ट चर्चेत
बॉलीवूडच्या आघाडीच्या कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करत मराठी चेहऱ्यांनी हिंदीत आपली ओळख निर्माण केली असली, तरी या चंदेरी दुनियेतील सगळ्यांचेच अनुभव सारखे नसतात. काही कलाकारांना तेथे चांगली वागणूक मिळते, तर काहींना दुजाभावाचा सामना करावा लागत असल्याचं समोर आलं आहे. अशातच आता मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले यांनी फेसबुकवर शेअर केलेली एक पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत असून, कलाविश्वात त्यावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
वैभव मांगले यांनी फेसबुकवर एक सडेतोड पोस्ट लिहित मराठी कलाकारांच्या हिंदीतील कामाचे होणारे कौतुक निरर्थक असल्याचे म्हटले आहे. “अमके मराठी कलाकार हिंदीत चमकणार, चमकले किंवा चमकतील” अशा प्रकारचं फालतू कोडकौतुक आधी बंद केलं पाहिजे, असा उद्वेग त्यांनी व्यक्त केला. हिंदी इंडस्ट्रीत काम मिळालं म्हणजे आपण खूप मोठे किंवा भारी कलाकार ठरतो का, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला असून, अशा विचारसरणीला त्यांनी ‘बिनडोकपणा’ असं म्हटलं आहे. आम्ही मराठीत काम करतो आणि येथील रसिक प्रेक्षक आमच्यावर भरभरून प्रेम करतात. त्यामुळे एखाद्याने हिंदीत नाव कमावलं म्हणून कुणी मराठी रसिक हिंग लावून विचारतं नाही त्याला…., असेही ते म्हणाले.
बॉलीवूडमधील मानसिकतेवर प्रहार करताना मांगले यांनी लिहिले की, हिंदी इंडस्ट्रीत मराठी कलाकारांना कधीही मुख्य नायक किंवा नायिका म्हणून प्राधान्य दिले जात नाही, तर केवळ मराठी पार्श्वभूमी असलेल्या दुय्यम भूमिकाच त्यांच्या पदरात पडतात. माधुरी दीक्षित आणि नाना पाटेकर यांचा अपवाद सोडला, तर हिंदीत मराठी कलाकारांना फारशी किंमत दिली जात नाही. इतकेच नव्हे तर, तिथे मराठी कलाकारांना ‘घाटी’ म्हणून संबोधले जाते आणि त्यांच्या मनात आपल्या कलाकारांबद्दल एक प्रकारचा आकस असतो, असेही ते म्हणाले. आमची प्रादेशिक कला कमी दर्जाची आणि हिंदीतील काम म्हणजे अव्वल, हा समज साफ चुकीचा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
या संदर्भात बोलताना त्यांनी मराठीतील दिग्गज कलाकारांचा अभिमानाने उल्लेख केला. प्रशांत दामले, उमेश कामत, प्रिया बापट, भरत जाधव, मुक्ता बर्वे, निर्मिती सावंत, मकरंद अनासपुरे, प्रसाद ओक आणि स्पृहा जोशी हे सर्व कलाकार मराठी प्रेक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि खूप मोठे आहेत, असे सांगत त्यांनी मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टीची ताकद अधोरेखित केली.
आपल्या या भूमिकेवर टीका करणाऱ्यांना आधीच उत्तर देत वैभव मांगले यांनी स्पष्ट केले की, काही लोक आता अशी टिप्पणी करतील की मला हिंदीत काम मिळाले नाही म्हणून मी हे बोलत आहे. पण अशा लोकांना मी आधीच सांगून ठेवतो की, मला हिंदी चित्रपटसृष्टीने कधीही भुरळ घातलेली नाही, किंवा तिथे काम केल्यावरच आपण मोठे कलाकार ठरतो, असं मला कधीही वाटत नाही. वैभव मांगले यांच्या या रोखठोक पोस्टने सोशल मीडियावर नव्या चर्चेला तोंड फोडले आहे.
Comments are closed.