पडद्याआडून – कॅरी ऑन स्पायगिरी! इंग्रजी नाटकाचा फसलेला मराठी अवतार!
>>परागकण खोत<<
अॅडगुरू भरत दाभोळकर हे इंग्रजी, हिंदी आणि गुजराती रंगभूमीवरील एक लौकिकप्राप्त नाव. जाहिरात क्षेत्रातील एक उत्तुंग नाव असण्यासोबत नाटय़क्षेत्रात सुमारे तीन दशकांचा अनुभव, 30-32 नाटकांची शिदोरी आणि मोठं फॅन फॉलोइंग त्यांच्या पाठीशी आहे. त्यांच्या ‘बॉटम्स अपसारख्या नाटकाने इंग्रजी रंगभूमीवर प्रदीर्घ प्रयोगांचा विक्रम केलाय. किशोर प्रधान, विहंग नायक, विजू खोटे, अतुल परचुरे यांसारख्या कसलेल्या कलाकारांसह त्यांनी स्वतःचा दबदबा निर्माण केला. रंगभूमीवर ‘हिंग्लिश’ लोकप्रिय करण्यातही त्यांचा मोलाचा वाटा आहे. पु. ल. देशपांडे, वसंत कानेटकर, जयवंत दळवी यांच्या नाटकांना इंग्रजी भाषेत रुपांतरित करून त्यांनी वेगळं स्थान मिळवलं. अशा पार्श्वभूमीवर ‘कॅरी ऑन स्पायिंग’ या त्यांच्याच मूळ इंग्रजी नाटकाचा मराठी अवतार ‘कॅरी ऑन स्पायगिरी’ रंगभूमीवर येतो तेव्हा अपेक्षांचा डोंगर उभा राहणं स्वाभाविकच होतं, मात्र येथे अपेक्षाभंग पदरी पडतो.
मराठी रंगभूमी ही आशय, अभिरुची आणि प्रयोगशीलतेच्या बाबतीत नेहमीच समृद्ध राहिली आहे. इथला प्रेक्षक चोखंदळ, नीरक्षीरविवेकी आणि सजग आहे. गोंधळ, अतर्क्य विनोद किंवा परिस्थितीजन्य ढोबळपणा यावर इथे टाळय़ा मिळत नाहीत. ‘कॅरी ऑन स्पायगिरी’ नेमपं इथेच कमी पडतं. विनोदाच्या नावाखाली उभा केलेला गोंधळ आणि तका&ला सोडून केलेली मांडणी यामुळे नाटक प्रेक्षकांशी जोडलं जात नाही. हा लौकिकार्थाने फार्स नाही त्यामुळे त्याचे नियम इथे लागू होत नाहीत. नाटक पुढे सरकत असताना तका&च्या भिंती ढासळत जातात.
कथानक पाकिस्तानमधील भारतीय दूतावासात घडतं. प्यारेमोहन दीक्षित हे दूतावासाचे प्रमुख आहेत आणि त्यांचे सहकारी आहेत प्रधान. या दोघांच्या आपापसात पुरबुरी सुरू आहेत. अशातच अनंत माधव जोशी, त्यांची पत्नी आशालता आणि मुलगी ट्विंकल हे एक मध्यमवर्गीय कुटुंब पाकिस्तानात पर्यटक म्हणून येतात आणि त्यांनी त्यांच्या पाकिस्तानातील भटपंतीत काढलेल्या पह्टोंवरून त्यांच्यावर हेरगिरीचा संशय घेतला जातो. पाकिस्तानी कमांडरच्या भीतीने ते भारतीय दूतावासात आश्रय घेतात. त्यानंतर गैरसमज, पळापळ, राजकीय टोमणे आणि प्रसंगाधारित विनोदांची मालिकाच सुरू होते. ऐकायला ही मांडणी रंगतदार वाटली तरी प्रत्यक्षात ती विस्कळीत भासते.
सर्वात मोठी उणीव म्हणजे वास्तवाचा अभाव. पाकिस्तानातील भारतीय दूतावासासारख्या अत्यंत संवेदनशील ठिकाणाचं चित्रण अत्यंत हलक्याफुलक्या पद्धतीने केलं गेलं आहे. प्रोटोकॉल, शिस्त, सुरक्षा यांचा लवलेशही दिसत नाही. पात्रे कधीही येतात-जातात आणि परिस्थिती विनोदाच्या नावाखाली ढकलली जाते. परिणामी हास्यनिर्मिती न होता नाटक भरकटत जातं. व्हॉट्सअॅपवर फिरणारे विनोद, ताज्या राजकीय घडामोडींवरचे निरर्थक चिमटे आणि पृत्रिम प्रसंग यामुळे नाटकाचा गाभाच कोसळतो. मधेच प्यारेमोहन आणि ट्विंकल यांच्या प्रेमप्रकरणाचे ठिगळ जोडलेले आहे. इतरही काही प्रसंग न पटणारे आहेत. विशेषतः नाटकातला ‘टाईम बॉम्ब’चा प्रसंग.
काही कलाकारांनी मात्र नाटक उचलून धरण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. विजय पटवर्धन आणि मुग्धा कर्णिक या जोडीने जीव तोडून काम केलं आहे, पण त्यांची मेहनत वाया जाते. मोहन आझाद यांसारखा अनुभवी कलाकारही प्रभाव पाडू शकत नाही. सुयश पुरोहित यांचं रामलिंगम हे पात्र विनोदाच्या अतिरेकाने पंटाळा आणतं. राहुल पेठे, गीतांजली गाणगे आणि आकाश भडसावळे यांचा प्रयत्न उत्तम आहे. संहिता लेखनात या भूमिकांवर अधिक काम व्हायला हवे होते. भरत दाभोळकर यांच्या रंगमंचावरील आगमनाला प्रेक्षकांच्या टाळय़ा पडतात. कारण ते मराठी रंगभूमीवर प्रथमच दिसतायत. नाटकाची तांत्रिक बाजूही फारसा प्रभाव पाडत नाही. संदेश बेंद्रे यांचं नेपथ्य देखणं असलं तरी त्याचा आवश्यक तो वापर होत नाही. साई पियूष यांचं संगीतही ‘ठीकठाक’ या चौकटीतच अडकतं. एकूणच, सर्व घटक असूनही नाटकात सुसूत्रता आणि परिणामकारकतेचा अभाव जाणवतो.
कुठल्याही भाषेतील प्रेक्षकांना गृहीत धरू नये असा अलिखित नियम आहे आणि त्यातही मराठी नाटय़रसिकांना तर अजिबातच गृहीत धरू नये. ते ज्याचं त्याचं माप बिनदिक्कत पदरात घालतात. एखाद्या नव्या नाटकाला, तिकीट काढून आलेले काही प्रेक्षक मध्यंतरानंतर उठून जात असतील तर त्या नाटकाचं भवितव्य काय असेल, हे सांगायला नको.
nलेखक–दिग्दर्शक ः भरत दाभोळकर
nकलाकार ः विजय पटवर्धन, मुग्धा कर्णिक, राहुल पेठे, सुयश पुरोहित, आकाश भडसावळे, गीतांजली गणेरे, जयवंत सातोस्कर, मोहन आझाद आणि भरत दाभोळकर
nबॅकस्टेज ः संदेश बेंद्रे
nसंगीत ः साई पियुष
nएकसमान ः मंगल केंकरे
nनिर्माते ः आकाश भडसावळे, सवाई गंधर्व
nनिर्मिती प्रमुख ः प्रशांत माणगावकर
nछायाचित्र सौजन्याने ः संजय पेठे
Comments are closed.