मराठी बोलता येत नसलेल्या 1268 वाहनचालकांना नोटीस; एक महिन्यात मराठी न आल्यास निलंबित होणार
रिक्षा-टॅक्सी व अन्य प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांच्या मराठी ज्ञानाची तपासणी करण्यासाठी आजपासून राज्यभरात मोहीम सुरू करण्यात आली. आज पहिल्याच दिवशी १२६८ वाहनचालकांना नोटीस बजावण्यात आली. त्यांना प्रवाशांशी व्यावहारिक संवाद साधता येईल इतकेही मराठी भाषेचे ज्ञान नसल्याचे परिवहन अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्याने ही कारवाई करण्यात आली.
नोटीस बजावलेल्या चालकांना पुढील एका महिन्याच्या कालावधीत मराठी भाषा शिकण्याची संधी आहे. त्यानंतरही त्यांना मराठी बोलता न आल्यास त्यांचा बॅज तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात येणार आहे. त्यामुळे बॅजशिवाय त्यांना प्रवासी वाहन चालवता येणार नाही, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
“महाराष्ट्रात व्यवसाय करणाऱ्या वाहनचालकांना व्यावहारिक मराठी येणे ही केवळ नियमांची बाब नसून प्रवाशांच्या सोयी-सुरक्षेशी संबंधित बाब आहे. चालकांना मराठी शिकण्यासाठी पुरेसा कालावधी दिला जात आहे, मात्र दिलेल्या मुदतीनंतरही नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल,” असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.
मुंबईत ६०४ चालकांवर बडगा
आज पहिल्याच दिवशी राज्यभरातील ८२१७ वाहनचालकांच्या मराठी ज्ञानाची तपासणी करण्यात आली. मुंबई महानगर क्षेत्रात ३९९५ वाहनचालकांपैकी ६०४ चालकांना व्यावहारिक मराठीचे पुरेसे ज्ञान नसल्याचे आढळून आल्याने त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. राज्याच्या उर्वरित भागात ४२२२ चालकांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ६६४ चालकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. ही तपासणी मोहीम ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे.
Comments are closed.