मराठीप्रेमींचे आज आझाद मैदानावर धरणे; पाचवीपर्यंत तिसरी भाषा नकोच, नरेंद्र जाधव समिती बरखास्त करा

पहिलीपासून हिंदी सक्ती लादणारा शासकीय निर्णय सरकारने तूर्त मागे घेतला असला तरी संकट टळलेले नाही. त्रिभाषा सूत्रासंदर्भात अभ्यास करण्यासाठी सरकारने डॉ. नरेंद्र जाधव समिती नेमली आहे. या भाषिक आणीबाणीविरोधात उद्या मराठीप्रेमी आझाद मैदानात धरणे आंदोलन करणार आहेत.
शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीने हे धरणे आंदोलन आयोजित केले आहे. पाचवीपर्यंत तिसरी भाषा नकोच आणि नरेंद्र जाधव समिती बरखास्त करा अशी या आंदोलनाची प्रमुख मागणी आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 5 दरम्यान त्यासाठी आझाद मैदानात धरणे धरले जाणार आहे. त्यात शिक्षणतज्ञ, भाषातज्ञ आणि असंख्य मराठीप्रेमी सहभागी होतील, असे कृती समितीचे अध्यक्ष दीपक पवार यांनी सांगितले.
समितीच्या अन्य मागण्या
- बालभारतीची शैक्षणिक स्वायत्तता अबाधित ठेवा.
- जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पाडणारी नवीन संचमान्यता रद्द करा.
- इंग्रजी भाषा पहिलीऐवजी तिसरीपासून शिकवा.
- मराठी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्यांना मोफत शिक्षण देऊन शासकीय नोकरीत प्राधान्य द्या.
- शासनाकडून प्रसारमाध्यमांशी साधला जाणारा संवाद केवळ मराठी भाषेतून केला जावा. हिंदीतून त्याची पुनरावृत्ती करू नका.
- हिंदी भाषेच्या वापराबाबत वस्तुस्थिती सांगणारी श्वेतपत्रिका काढा.
अपारदर्शक प्रक्रिया राबवणारे शिक्षणमंत्री दादा भुसे आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांचे तातडीने राजीनामे घ्याअशी समन्वय समितीची मागणी आहे.
Comments are closed.