घटस्फोटानंतर पहिलं प्रेम समोर आलं आणि…; बदलत जाणाऱ्या नात्याची कहाणी झळकणार पडद्यावर

मराठमोळा अभिनेता ललित प्रभाकरचा आरपार हा चित्रपट सध्या गाजतोय. ललित सध्याच्या घडीला तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. येत्या काही दिवसात ललित पुन्हा एकदा ‘प्रेमाची गोष्ट 2’ यामध्ये झळकणार आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘प्रेमाची गोष्ट २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

या चित्रपटाचा टिझर आणि गाणी रिलीज आधीच चर्चेत होती. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, हा ट्रेलर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता आणखीच वाढली आहे. ट्रेलर लाँच सोहळ्यावेळी अभिवेता ललित प्रभाकर, ऋता वैद्य आणि रिधिमा पंडित यांनी चित्रपटातील ‘ओल्या सांजवेळी 2.0’ व ‘ये ना पुन्हा’ या गाण्यांवर नृत्य सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.

चित्रपटात ललितच्या आयुष्यात आलेली वळणं दाखवण्यात आली आहेत. लग्न, घटस्फोट आणि त्यानंतर पुन्हा समोर आलेलं जुनं प्रेम असे विविध कंगोरे या कथानकात आहेत. यामुळे ललितच्या आयुष्यात नेमकी काय वादळं येतात हे चित्रपट पाहिल्यावरच आपल्याला उमजेल.

https://www.youtube.com/watch?v= pg_1lukpv84

एव्हरेस्ट एंटरटेनमेंटचे निर्माते संजय छाब्रिया आणि सह-निर्माते अमित भानुशाली यांचा हा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धूरा सतीश राजवाडे याने लीलया पेलली आहे. एखादी प्रेमकथा कशी मांडावी यात सतिशचा हातखंडा आहे.

ललित प्रभाकर, ऋता वैद्य, रिधिमा पंडित, स्वप्निल जोशी, भाऊ कदम यांच्यासारखे कसलेले कलाकार यात आपल्याला पाहायला मिळतील. ‘प्रेम आणि नशिबाचा हा जादुई प्रवास’ प्रेक्षकांच्या भेटीला येत्या २१ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

Comments are closed.