न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठीचा जयघोष; ‘तिघी’ला सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार
न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये (NYIFF) मराठीचा आवाज घुमला असून ‘तिघी’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथेचा बहुमान निखिल महाजन आणि प्राजक्त देशमुख यांना मिळाला आहे. तर’बुंग’ (Boong) या मणिपुरी चित्रपटाने तीन पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे, ज्यामध्ये या चित्रपटातील मुख्य बालकलाकाराला मिळालेल्या सर्वोत्कृष्ट बालकलाकाराच्या पुरस्काराचाही समावेश आहे.
न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल २०२६ ची सांगता रविवारी एका शानदार पुरस्कार सोहळ्याने झाली, ज्यामध्ये दहा वेगवेगळ्या विभागांमधील हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कलाकृतींचा गौरव करण्यात आला.
२८ ते ३१ मे या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या चित्रपट महोत्सवात १५ भाषांमधील वैविध्यपूर्ण चित्रपट दाखवण्यात आले, ‘ज्यामुळे समकालीन हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीतील प्रादेशिक कथांच्या वाढत्या प्रभावावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले’; तसेच इंडिपेंडंट हिंदुस्थानी चित्रपटांना समर्पित असलेल्या उत्तर अमेरिकेतील या सर्वात जुन्या चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने अनेक चित्रपट निर्माते आणि कलाकार एकत्र आले होते.
‘इंडो-अमेरिकन आर्ट्स कौन्सिल’ (IAAC) द्वारे सादर करण्यात आलेल्या या चित्रपट महोत्सवाच्या यंदाच्या कार्यक्रमात १९ फीचर फिल्म्स, ४ डॉक्युमेंट्री फीचर्स आणि २७ शॉर्ट फिल्म्स यांचा समावेश होता, ज्यामध्ये अनेक चित्रपटांचे वर्ल्ड प्रीमियर आणि एका विशेष एलजीबीटीक्यू (LGBTQ) शॉर्ट फिल्म्स कार्यक्रमाचाही समावेश होता.
या महोत्सवातील सर्वोच्च बहुमान मानला जाणारा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘बक्शो बंदी’ (शॅडोबॉक्स) या चित्रपटाला मिळाला, तर ‘बुंग’ या मणिपुरी चित्रपटाने ‘फिल्म क्रिटिक्स सर्कल ऑफ इंडिया’ने निवडलेला बेस्ट डेब्यू फिल्म, लक्ष्मीप्रिया देवी यांच्यासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि गुगुन किपगेन याच्यासाठी सर्वोत्कृष्ट बालकलाकार असे तीन पुरस्कार जिंकले.
‘विमुक्त’ चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी निखिल यादव याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला, तर ‘व्हिक्टोरिया’ चित्रपटासाठी मीनाक्षी जयन हिने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला. सर्वोत्कृष्ट पटकथेचा (स्क्रीनप्ले) बहुमान ‘तिघी’ चित्रपटासाठी निखिल महाजन आणि प्राजक्त देशमुख यांना मिळाला. नॉन-फिक्शन श्रेणींमध्ये, ‘डेझा वू’ने सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री फीचर आणि ‘वाई’ने सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री शॉर्टचा पुरस्कार जिंकला, तर ‘जोज् टर्न’ने सर्वोत्कृष्ट नॅरेटिव्ह शॉर्टचा पुरस्कार मिळवला.
Comments are closed.