Ratnagiri News – कोकणातला कलाकार आता मुंबईच्या रंगभूमीवर, लांजातील ‘रंग भरू दे आमुच्या रे गणा’ ची मुंबईत धडक

>>दुर्गेश आखाडे

नाट्यक्षेत्रात कारकिर्द घडविण्यासाठी पूर्वी कोकणातील कलाकार मुंबईत जात आणि व्यावसायिक रंगभूमीवर काम करत होते. कोकणातील कलाकार “पारावरची” नाटकं करत होता पण हा शिक्का पुसून काढत कोकणातील कलाकारांनी थेट मुंबईच्या रंगभूमीवर धडक मारली आहे. कोकणच्या लालमातीतील कलाकारांना घेऊन कोकणातूनच व्यावसायिक दर्जाच्या नाटकाची निर्मिती करून त्या नाटकाचे मुंबईत प्रयोग करण्याचे धाडस रत्नागिरीतील ग्रामीण भागातील कलाकारांनी केले आहे. ‘रंग भरू दे रे आमुच्या गणा’ या नाटकाचा उद्या २२ ऑक्टोबर रोजा दीनानाथ नाट्यगृहात प्रयोग होत आहे. कोकणातील कलाकारासाठी मुंबईतील रंगभूमीचे दरवाजे उघडले आहेत.

जिल्हा परिषदेच्या शाळेत ज्ञानदानाचे काम करणारे प्राथमिक शिक्षक राजेश गोसावी यांनी हे धाडसी पाऊल उचलले आहे. राजेश गोसावी यांनी उत्सवात पारावरचे नाट्यप्रयोग करत असताना आपल्याही नाटकाचा प्रयोग तिकिटं लावून मुंबईतील रंगभूमीवर झाला पाहिजे, हे स्वप्न पाहिले. रंग भरू दे आमुच्या गणा या नाटकाचे सहजसुंदर लेखन करताना दिग्दर्शनाचे शिवधनुष्य पेलले. या नाट्यप्रयोगाने काही महिन्यातच ३९ प्रयोगांचा टप्पा पार करताना मुंबई मराठी रंगभूमीवर झेप घेतली आहे. दि.२२ ऑक्टोबर रोजी रात्री सवा आठ वाजता दीनानाथ नाट्यगृहात त्यांचा प्रयोग होणार आहे. समीर घारे, पंढरीनाथ मायशेट्ये, गौतम कांबळे आणि संतोष म्हेत्रे यांचे या नाटकाला पाठबळ मिळाले आहे. या नाटकात राजेश गोसावी, नंदू जुवेकर, ऐश्वर्या बापट, श्रावणी करंबेळे, दीपक माणगावकर, राहुल तोडकरी, सचिन काष्टे, संदेश पवार, सागर काष्टे, आदित्य खाडे, सुजित मोहित, आकाश चौघुले, सागर चौघुले, वैष्णवी बोंबले, वेंदाती बोंबले आणि सृष्टी बोंबले यांच्या भूमिका आहेत तर श्रीकांत बोंबले यांनी गायनातून नाटकात रंग भरला आहे.

Comments are closed.