मराठी स्टँडअप कॉमेडीची हिंदी-इंग्रजीला टक्कर

मंदार भिडे

बदलत्या काळानुसार विनोदाच्या सादरीकरणाचे स्वरूप स्टँडअप कॉमेडीपर्यंत पोहोचले असून त्यात मराठी पाऊल पुढे पडते आहे. मराठी मनोरंजनविश्वात सध्या स्टँडअप कॉमेडीची लाट आली असून मराठी शो हिंदी-इंग्रजी स्टँडअप्सनाही जोरदार टक्कर देत आहेत.

एकेकाळी हिंदी किंवा इंग्रजी भाषिक कलाकारांचे वर्चस्व असलेल्या स्टँडअप कॉमेडी प्रकारात आता मराठी तरुणांनीही जम बसवला आहे. नव्या दमाच्या अनेक मराठी तरुणांनी आपल्या विनोदबुद्धीने प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. ‘वळवावी तशी वळणारी’ मराठी भाषा आणि राम गणेश गडकरी, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे यांच्यासारख्या दिग्गजांच्या साहित्याचा प्रभाव हे यामागचे एक प्रमुख कारण आहे. मराठी माणसाला विनोदाचे नेहमीच आकर्षण राहिले आहे. स्टँडअप कॉमेडीने हा खजिनाच त्यांच्यासाठी खुला केला आहे. किस्से, कहाण्या सांगत आपल्या चुकांवर हसता-हसता बोट ठेवण्याच्या हातोटीमुळे मराठी प्रेक्षकवर्ग स्टँडअप कॉमेडीशी जोडला जात आहे.

आजचे आघाडीचे स्टँड-अप कॉमेडियन मंदार भिडे यांनी यास दुजोरा दिला. ‘हिंदी-इंग्रजीच्या तुलनेत मराठी स्टँडअप खूप मागे असली तरी त्यात मोठी क्षमता आहे. त्याची स्पर्धा थेट मराठी नाटकांशी होते. सर्वार्थाने समृद्ध मराठी रंगभूमीवरील विनोदी नाटकांना टक्कर देणे सोपे नाही. तरीही मराठी कलाकार काही वेगळं करू पाहत आहेत. कंबरेखालचा विनोद टाळून सहकुटुंब पाहता येतील असे निखळ विनोदी स्टँडअप्स सादर होत आहेत आणि प्रेक्षकांचा त्यांना प्रतिसाद मिळतोय,’ असे भिडे यांनी सांगितले.

राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळेल!

मराठी स्टँडअप हा मराठी संस्कृतीला नव्या पिढीपर्यंत पोहोचवणारा प्रवाह आहे. वाढता प्रतिसाद पाहता लवकरच मराठी स्टँडअपला राष्ट्रीय मान्यता मिळेल, असे जाणकारांना वाटते.

नाट्यगृहातही होऊ लागले शो

स्टँडअप कॉमेडी मोठा अवकाश व्यापू लागली आहे. नाटय़गृहातही हे शो होऊ लागलेत. 6 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता मंदार भिडे यांचा ‘शुभमंगल सावधान’ हा स्टँडअप शो दीनानाथ नाटय़गृहात होत आहे. ‘स्मृतीगंध’ संस्थेने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

Comments are closed.