जन्माने ज्यू… विवाहाने मुस्लिम… संसार मराठीचा

नाव-जेरुषा रुबेन… धर्म-बेनेइस्रायली ज्यू आणि मातृभाषा मराठी… महाराष्ट्राला प्रा. यास्मिन शेख म्हणून परिचित असलेल्या जेरुषा रुबेन यांची ही खरी ओळख आहे. त्यांची ही ओळख चकीत करणारी आहेच, पण तितकाच त्यांचा जीवनप्रवासही प्रेरणादायी आहे.

21 जून 1925 रोजी नाशिकमध्ये ज्यू कुटुंबात जन्मलेल्या प्रा. यास्मिन शेख यांचे मूळ नाव जेरुषा रुबेन होते. जेरुषा यांनी 1949 मध्ये अझीझ अहमद इब्राहिम शेख यांच्याशी आंतरधर्मीय विवाह केला. त्यानंतर त्या यास्मिन शेख झाल्या खऱया, पण त्यांनी आपला मूळ धर्म बदलला नाही. पुण्यातील एस.पी. कॉलेजमधून मराठी विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करताना त्यांना प्रा. एस.एम. माटे आणि प्रा. के.एन. वातवे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यानंतर प्रदीर्घ काळ त्यांनी मराठी विषयाचे अध्यापन केले. प्रा. शेख यांनी प्रमाणभाषेसोबतच बोलीभाषांचाही सखोल अभ्यास केला.

प्रमाणभाषेचा आग्रह

ललित साहित्यात बोलीभाषा चालू शकते, मात्र निवेदनात आणि वैचारिक लेखनात प्रमाणभाषाच हवी याबाबत त्यांची मते ठाम होती. एका बोलीभाषेतील लेखनाचे नेमके आकलन दुसरी बोलीभाषा असलेल्या वाचकाला होणार नाही आणि पर्यायाने भाषेच्या क्षेत्रात अनागोंदी माजेल, अशी त्यांची यामागची भूमिका होती. व्याकरणाचे नियम आपण पाळलेच पाहिजेत असा त्यांचा आग्रह होता. सर्वच शास्त्रांमध्ये त्या-त्या शास्त्राचे नियम असतात आणि आपण ते विनातक्रार पाळतच असतो. इंग्रजी शब्दांचे स्पेलिंगदेखील आपण घोकून घोकून पाठ करत असतो, मग मराठीच्या बाबतीत पंटाळा का करायचा असे त्या म्हणायच्या. मराठी व्याकरणाविषयी आग्रही असल्या तरी त्या दुराग्रही अजिबात नव्हत्या. बदलत्या काळानुसार त्यात विशेषतः हस्व-दीर्घाबाबतच्या नियमांमध्ये बदल करायला हवेत, अशीही त्यांची भूमिका होती.

मुलांना वाटलं, बुरख्यातली बाई शिकवायला येणार!

मुस्लिम नावामुळं सुरुवातीच्या काळात विद्यार्थ्यांच्या मनात त्यांच्याविषयी एक वेगळीच प्रतिमा निर्माण व्हायची. त्याची आठवण यास्मिन शेख यांनीच सांगितली होती. माझं नाव कळल्यावर मुलांना वाटलं होतं की, आता बहुतेक बुरख्यातली बाई शिकवायला येणार, ती तुकारामांचे अभंग कसे शिकवणार? त्यामुळे सगळे विद्यार्थी थट्टा करायच्या तयारीत बसलेले असायचे. तेव्हा माझे केस कापलेले होते. मी पाचवारी साडी नेसलेले असायचे. त्यामुळे वर्गात गेल्यावर मुले माझ्याकडे चकित होऊन बघायची. मला कळायचं नाही की, हे एवढे चकित होऊन काय पाहत आहेत. मात्र हळूहळू हे आश्चर्य संपलं. काही दिवसांतच त्यांना माझं शिकवणं आवडायला लागलं.

महाराष्ट्र विद्वान मार्गदर्शकाला मुकला – शरद पवार

यास्मिन शेख यांच्या जाण्याने मराठी भाषा, व्याकरण आणि भाषाशास्त्राला संपूर्ण जीवन समर्पित करणाऱया एका विद्वान मार्गदर्शकाला महाराष्ट्र मुकला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी आग्रह धरतानाच भाषेचा अभिजातपणा जपणे आणि समृद्ध करणे ही आपली जबाबदारी आहे. हा आदर्श त्यांनी आपल्या कृतीतून ठेवला, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी श्रद्धांजली वाहिली.

शब्दांना अर्थ आणि सौंदर्य देणारे व्यक्तिमत्त्व हरपले – फडणवीस

प्रा. यास्मिन शेख यांच्या निधनाचे वृत्त मनाला चटका लावणारे आहे. मराठी भाषेच्या शुद्धतेसाठी, सौंदर्यासाठी आणि नव्या पिढीमध्ये भाषेची गोडी निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेले कार्य कायम स्मरणात राहील. त्यांच्या निधनामुळे मराठी शब्दांना अर्थ आणि सौंदर्य देणारे व्यक्तिमत्व हरपले,’ अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या.

अद्भुत व्यक्तिमत्त्व – राज ठाकरे

‘यास्मिनबाईंसारख्या व्यक्तींबद्दल मला कमालीचं कुतूहल आणि आदर आहे. एखादी भाषा आणि तिचा आत्मा टिकून राहावा या आग्रहासाठी संपूर्ण आयुष्य देणं हे विलक्षण आहे आणि आजच्या काळात अद्भुत आहे. त्यांच्या जाण्याने केवळ एक व्याकरणतज्ञ गेल्या असं नाही, तर भाषेवर प्रेम करणं म्हणजे तिच्याशी काटेकोर राहणं असं मानणाऱया एका पिढीचा आणखी एक दुवा निखळला, अशा भावना राज ठाकरे यांनी व्यक्त केल्या.

ज्ञानवृक्ष कोसळला – सुनेत्रा पवार

मराठी भाषा, व्याकरण आणि भाषाशास्त्राच्या क्षेत्रात आपल्या प्रदीर्घ आणि समर्पित कार्यातून मोलाचे योगदान देणाऱया यास्मिन शेख यांच्या निधनाने मराठी भाषाविश्वाची मोठी हानी झाली असून, मराठी भाषेचा ज्ञानवृक्ष कोसळला, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या.

भाषायोगिनी – प्रा. मिलिंद जोशी

शतकपूर्ती केलेली ही विदुषी मराठी भाषेचे वैभव होती. व्याकरणासारखा रुक्ष आणि क्लिष्ट वाटणारा विषय यास्मिन शेख यांनी कवितेसारखा ललितरम्य पद्धतीने शिकवला. मराठी भाषेच्या उत्कर्षाची आस बाळगून आणि व्याकरणाचा ध्यास घेऊन त्यांनी आयुष्यभर जे काम केले ते पुढच्या अनेक पिढय़ांसाठी मोलाचे आहे. त्यांच्या निधनाने व्याकरणाच्या व्यासंगाचे आणि साधनेचे एक पर्व संपले आहे, अशा भावना लेखक प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केल्या.

योगदान इतिहासात कोरले जाईल – उल्हास पवार

यास्मिन शेख यांचे मराठी भाषेवर व साहित्यावर अपार प्रेम होते. मराठी व्याकरण व भाषाशुद्धीसाठी शेवटच्या श्वासापर्यंत त्या कार्यरत होत्या. व्याकरण व शब्दार्थ याबाबतीत त्यांचा निर्णय हा अंतिम मानला जायचा. त्यांचं संशोधन व चिकित्सात्मक लेखन व ग्रंथ ऐतिहासिक ठेवा आहे. त्यांचं योगदान इतिहासात कोरलं जाईल, अशा शब्दांत काँग्रेस नेते उल्हास पवार यांनी यास्मिन शेख यांना श्रद्धांजली वाहिली.

Comments are closed.