फुलोर्यापासून फळापर्यंतचा प्रवास अडखळला, मराठवाड्यातील केशर आंबा उत्पादक संकटात
>> उदय जोशी
मराठवाड्यातील शेतकर्यांसाठी गेम चेंजर ठरणारा केशर आंबा यंदा दरवळण्यापूर्वी उद्धवस्त झाला. तब्बल दिड लाख हेक्टरवरील उभ्या असलेल्या केशर आंब्याच्या मोहराचे रूपांतर फळामध्ये झालेच नाही. उत्पादनामध्ये मोठी घट झाल्याने शेतकर्यांना प्रचंड आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. बदलत्या हवामानामुळे फळधारणा प्रक्रियाच झाली नाही. केवळ २० टक्के उत्पादन पदरात पडणार असल्याने हेक्टरी ८ ते १० लाख रूपयाचे नुकसान शेतकर्यांना सहन करावे लागणार आहे.
पांढर्या सोन्याच्या म्हणजे कापसाच्या पट्ट्यामध्ये केशर आंब्याची हरीत क्रांती निर्माण झाली. गेल्या दोन-तीन वर्षात बीड जिल्ह्यामध्ये तीन हजार हेक्टरवर केशर आंबा लागवड झाली. तर मराठवाड्यात केशर आंबा लागवडीचा उच्चांक झाला आहे. दिड लाख हेक्टरवर सध्या केशर उभा आहे. मराठवाड्यात पिकणारा केशर आता महाराष्ट्रापुरता मर्यादीत राहिला नव्हता तर तो थेट दुबई, सौदी अरेबियासह युरोपच्या बाजारपेठेमध्ये पोहोचत होता. हेक्टरी १० लाख रूपये निव्वळ नफा कमवून देणारा फळांचा राजा आंब्याने यंदा शेतकर्यांना उद्धवस्त केले आहे. पारंपारिक पिकांना फाटा देत बीड जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी आता फळबागाकडे वळाले आहेत. त्यात रेशीम उत्पादनातही बीड जिल्ह्याने मोठी कूच केली आहे. यात केशरआंबा आशेचा किरण ठरत असताना शेतकर्यांच्या केशरी स्वप्नांचा चुराडा झाला आहे.
बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यामध्ये केशरआंब्याची लागवड मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. बीडमध्ये तीन हजार, नांदेड २१ हजार हेक्टर, छत्रपती संभाजीनगर २५ हजार हेक्टर, धाराशिव १९ हजार हेक्टर, लातूर १७ हजार हेक्टर क्षेत्र केशरआंब्याने वेढले आहे. लागवड कितीही वाढली तरी केशर आंब्याला देशांतर्गत आणि देशाबाहेरील बाजारपेठेत मोठी मागणी असल्याने चांगला दर आणि खरेदीदार मिळत असल्याने केशरआंबा हे उत्पादन गेम चेंजर ठरले असते. मात्र गेल्या दोन-तीन वर्षापासून हवामानात झालेल्या बदलाचा मोठा फटका केशर आंब्यासह फळबागांना बसला आहे.
यंदा आंब्याची फळधारणाच झाली नाही. केशरआंबा हा हवामानास अत्यंत संवेदनशिल पिकापैकी एक पीक मानले जाते. आंबा फुलोर्यात असताना तापमानात झालेली अचानक चढ उतार, अवेळी पाऊस आणि ढगाळ वातावरण, रात्रीच्या तापमानातील वाढ, आद्रतेतील घट-वाढ या सर्व घटकांमुळे परागण आणि फलधारणा या प्रक्रियेमध्ये मोठे अडथळे आले. ढगाळ वातावरण आणि उच्च आद्रतेमुळे मधमाशांच्या हालचाली कमी झाल्या. परिणामी परागण अपूर्ण राहिले. अतिरिक्त उष्णतेमुळे फुलोर्यातील नर-फुले जास्त प्रमाणात टिकून राहिली. तर मादी फुलांचे प्रमाण घटले. तापमानातील ताणामुळे ऑक्सिन आणि गिबरेलिंग यांच्यात संतुलन बिघडले. फ्लॉवर टु फ्रुट ड्रॉप वाढला. ज्या झाडावर फळधारणा झाली त्या ठिकाणी फुलगळ आणि फळांची गळ मोठ्या प्रमाणावर झाली. हेक्टरी ८ ते १० तण उत्पादन अपेक्षित होते. मात्र त्यात प्रचंड घट होऊन उत्पादन केवळ एक टन ते दिड टनापर्यंतच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केशर आंब्याची आवक मोठ्या प्रमाणावर घटणार आहे. त्याचा आर्थिक फटका शेतकरी बांधवांना बसणार आहे.
पंचतत्व आधारित शेती केल्यास फटका बसत नाही
भारतीय संस्कृतीला आणि शेती संस्कृतीला हजारो वर्षाची परंपरा आहे. अध्यात्मिक आणि वैज्ञानिक याची सांगड घालत पंचतत्वावर आधारित शेती केली जायची. ती शेती कृषी पंचांगावर अवलंबून असायची. आता पंचतत्व आधारित शेतीकडे साफ दुर्लक्ष होत आहे. अमावस्या आणि पौर्णिमा या दोन घडामोडी शेतीसाठी फार महत्वाच्या असतात. चंद्राची कला जशी जशी वाढेल तसतसे पोषणद्रव्य झाडाच्या शिखरापर्यंत जात असतात. पौर्णिमेला ते शिखराचा उच्चांक गाठत असतात तर आमावस्येच्या दिवशी झाडातील न्युट्रेशन जमिनीकडे सरकत असतात. १८ मार्च रोजी झालेल्या अमावस्येच्या दिवशी आंब्याच्या पिकाला सर्वाधिक फटका बसला. न्युट्रेशन जमिनी गेले आणि पोषण मिळाले नसल्याने त्या दिवशी ५० टक्के आंबा फळ हे गळाले. वैज्ञानिक दृष्टीकोणातून कृषी पंचांगात याची मांडणी केलेली आहे. पण आपण त्याकडे लक्ष देत नाहीत. माझ्याकडे असलेला केशर आणि सोनपरी आंबा पूर्णपणे सुरक्षित आहे. उत्पादन घटण्याऐवजी वाढणार आहे.
-धैर्यशिल सोळंके, कृषी अभ्यासक आणि प्रगतशिल शेतकरी, बीड.
केवळ आंबाच नाही तर फळबागा धोक्यात
गेल्या तीन वर्षापासून आंबा आणि इतर फळबागा ऐन बहरात असताना वातावरणातील बदलाचा फटका फळबागांना बसत आहे. यंदा आंबा मोहरात प्रचंड आला आणि धुईत सापडला. त्या धुईमुळे मोहोर गळून गेला. आंब्याची सेटिंग झाली नाही. केवळ २० टक्केच आंबा यंदा पदरात पडणार आहे. मोहोर येवूनही फळ हातात न पडणे हे यंदाच झाले असले तरी गेल्या तीन वर्षापासून अवकाळी, गारपीट, धुई अशा संकटामध्ये आंबा सापडत असल्याने शेतकर्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटत आहे. -कल्याण कुलकर्णी, आंबा उत्पादक, बीड
Comments are closed.