ओबीसींवर अन्याय करणाऱ्या महायुती सरकारचा निषेध असो! मराठवाडा मुक्तिसंग्राम कार्यक्रमात आंदोलकांनी फडकावले काळे झेंडे

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुभेच्छा संदेश देत असतानाच 'ओबीसींवर अन्याय करणाऱ्या महायुती सरकारचा निषेध असो', अशा घोषणा देत आंदोलकांनी काळे झेंडे फडकावले. यामुळे एकच गोंधळ उडाला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील सिद्धार्थ उद्यानातील मुक्तिसंग्राम हुतात्मा स्तंभाच्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण झाले. यावेळी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू केल्यामुळे ओबीस समाज संतप्त झाला असून त्याचे पडसाद याठिकाणी उमटले. 'ओबीसींवर अन्याय करणाऱ्या महायुती सरकारचा निषेध असो', या घोषणा देत काही आंदोलकांनी काळे झेंडे दाखवून 'हैदराबाद गॅझेट रद्द करा, ओबीसींवर अन्याय करू नका'अशा घोषणा देत गोंधळ घातला. यामुळे एकच गोंधळ उडाला. अखेर पोलिसांनी ओबीसी समाज संघटनेचे रामभाऊ पेरकर यांच्यासह आंदोलकांना ताब्यात घेतले.
हा स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान – मुख्यमंत्री
आपण मुक्तिसंग्राम दिनाचा कार्यक्रम करतोय आणि त्यात येऊन काही लोक नारेबाजी करतात, यापेक्षा मोठा स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान असू शकत नाही. चार माणसे येतात आणि अशाप्रकारे नारेबाजी करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात, हे योग्य नाही, तथापि मी त्यासंदर्भात काहीच बोलणार नाही, ईश्वर त्यांना सुबुद्धी देईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
Comments are closed.