19 मार्च रोजी कोणताही उपाय सापडला नाही तर दिल्लीला मार्च
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्ली कूचसंबंधी शेतकरी नेत्यांची रविवारी शंभू बॉर्डरवर झालेल्या बैठकीनंतर सोमवारी सकाळी पुन्हा एकदा दोन्ही संघटनांच्या नेत्यांची बैठक झाली. बैठकीनंतर शेतकरी नेते सरवन सिंह पंधेर यांनी सध्या 25 फेब्रुवारी रोजी दिल्ली कूच करण्याचा निर्णय टाळण्यात आला असल्याची माहिती दिली आहे. केंद्र सरकारसोबत यापूर्वी दोन बैठका झाल्या आहेत. आता 19 मार्च रोजी पुन्हा बैठक आहे. त्या बैठकीत कुठलाच तोडगा न निघाल्यास 25 मार्च रोजी 101 शेतकऱ्यांची तुकडी दिल्ली कूच करणार असल्याचे पंधेर यांनी सांगितले आहे. हा निर्णय किसान मजदूर मोर्चा आणि संयुक्त किसान मोर्चा बिगर राजकीयच्या नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला.
पिकांना हमीभाव समवेत अनेक मागण्यांकरता आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांच्या प्रतिनिधीमंडळ आणि केंद्र सरकारदरम्यान शनिवारी चंदीगड येथे झालेल्या सहाव्या फेरीची बैठकही निष्फळ ठरली होती. बैठक सुमारे अडीच तास चालली होती, परंतु यात कुठलाच तोडगा निघू शकला नव्हता. आता पुढील बैठक 19 मार्च रोजी होणार आहे.
काही आकडेवारी मागविण्यात आली आहे. शेतकऱ्यांकडे स्वत:चे आकडे आहेत, तर केंद्र सरकारकडे स्वत:चा डाटा आहे. दोन्ही आकडेवारींचे अध्ययन केले जाणार असल्याचे केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बैठकीनंतर म्हटले होते. शिवराज सिंह, प्रल्हाद जोशी आणि पियूष गोयल यांनी शेतकरी नेते जगजीत सिंह डल्लेवाल यांना उपोषण संपुष्टात आणण्याचे आवाहन केले आहे. जोपर्यंत सर्व पिकांवर हमीभावाची गॅरंटी मिळत नाही, तोवर उपोषण संपविणार नसल्याचे डल्लेवाल यांनी म्हटले आहे.
Comments are closed.