गुंगीचे औषध देऊन विवाहितेवर लैंगिक अत्याचार; साहिल चौगुलेचे टेन्शन वाढले, पोलीस ठाणे बदलले, ‘आयओ’ ही बदलला
शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन विवाहितेवर लैंगिक अत्याचार करणारा शिंदे गटाचा स्वीकृत नगरसेवक साहिल चौगुले याच्या अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणी रबाळे पोलीस साहिलला पाठीशी घालीत असल्याचा आरोप झाल्यानंतर पोलीस आयुक्तांनी हा गुन्हा रबाळे पोलिसांकडून काढून घेऊन तो वाशी पोलिसांकडे दिला आहे. पूर्वी या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अलका पाटील या करीत होत्या. त्यांनाही आता बदलण्यात आले आहे. दरम्यान, पिडीत तरुणीला न्याय मिळावा यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जोरदार पाठपुरावा करण्यात आला. या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.
शिंदे गटाचा स्वीकृत नगरसेवक साहिल चौगुले हा नवी मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांचा पुतण्या आहे. तळवली येथे राहत असलेल्या २६ वर्षीय विवाहितेवर त्याने लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ काढले. ते व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर दोन वर्षे अत्याचार केला. हा छळ असाह्य झाल्यानंतर तिने रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार रबाळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी साहिलला वाचवण्याची धडपड सुरू केली. पोलिसांच्या या पक्षपाती तपासाच्या विरोधात शिवसेना राज्य संघटक अवधेश शुक्ला यांनी आवाज उठवला. पोलिसांचा हा कारनामा शिवसेना उपनेत्या-मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, शिवसेना सचिव सुप्रदा फातर्पेकर, जिल्हा संपर्क संघटक रंजना नेवाळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन उघड केला. त्याची गंभीर दखल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घेऊन हा गुन्हा रबाळे पोलिसांकडून काढून घेऊन आज तो वाशी पोलिसांकडे वर्ग केला.
Comments are closed.