शहीद बाळकृष्ण निकम अमर रहे! पिंपळोशीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

पाटण तालुक्यातील पिंपळोशी येथील शहीद जवान बाळकृष्ण विलासराव निकम (वय 41) यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी पिंपळोशी गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सैन्य दल व पोलीस दलाच्या वतीने बंदुकीच्या फैरी झाडून अखेरची मानवंदना देण्यात आली. यावेळी कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले, तर हजारो उपस्थितांचा कंठही दाटून आला. यावेळी ‘शहीद बाळकृष्ण निकम अमर रहे’च्या घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला होता.

बॉम्बे इंजिनीअरिंग ग्रुपमध्ये 22 वर्षांपासून कार्यरत असलेले जवान बाळकृष्ण निकम यांना बुधवारी (दि. 11) सिक्कीममधील दुर्गम भागात वीरगती प्राप्त झाली. आज चौथ्या दिवशी सकाळी त्यांचे पार्थिव पाटणमध्ये दाखल झाले. यावेळी फुलांनी सजवलेल्या वाहनावर पर्थिव ठेवून त्यांची पाटणपासून त्यांच्या मूळगावी पिंपळोशीपर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली. ठिकठिकाणी ग्रामस्थांकडून पार्थिवावर पुष्पवृष्टी करण्यात येत होती. अंत्ययात्रेत हजारो नागरिक, महिला, युवक-युवती, विद्यार्थी, एनसीसी कॅडेट सहभागी झाले होते. जवान बाळकृष्ण निकम यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले. यावेळी अंत्यदर्शनासाठी जनसागर उसळला होता.

अंत्यदर्शन घेताना शहीद निकम यांच्या आई-वडील, पत्नी पूनम, मुलगा प्रणव, अर्णव, लहान भाऊ शिवराज, बहीण, भावजय, पुतणे यांच्यासह कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. यावेळी उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. पार्थिवाचे दर्शन घेतल्यानंतर निवासस्थानासमोर मानवंदना देण्यात आली. तद्नंतर जवान बाळकृष्ण निकम यांच्यावर त्यांच्याच शेतामध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

जिल्हाधिकारी डॉ. संतोष पाटील, पोलीसप्रमुख तुषार दोषी, सत्यजितसिंह पाटणकर, प्रांताधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार अनंत गुरव, पोलीस निरीक्षक अविनाश कवठेकर, पाटण तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रांत कांबळे यांच्यासह मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर सैन्यदल व पोलीस दलाच्या वतीने शहीद बाळकृष्ण निकम यांना बंदुकीतून फैरी झाडून मानवंदना दिली.

मंत्री, आमदार, खासदारांची अनुपस्थिती

– सातारा जिल्हा हा शूरवीरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील सर्वाधिक जवान सैन्य दलात आहेत. त्यातील पाटणसारख्या दुर्गम तालुक्यातील पिंपळोशी गावचे जवान बाळकृष्ण निकम सीमेवर कार्यरत असताना शहीद झाले. या जवानाचे पार्थिव पिंपळोशी गावी आणल्यानंतर जिह्यातील मंत्रिमहोदयांनी उपस्थित राहणे अपेक्षित होते. जिह्यात चार मंत्री, दोन खासदार, आमदार असताना एकजणही जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित नव्हते. याबाबत उपस्थितांनी खेद व्यक्त केला. महत्त्वाचे म्हणजे पालकमंत्री शंभूराज देसाई हे याच तालुक्याचे लोकप्रतिनिधी असूनही त्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय होती.

Comments are closed.