बंजारा समाजाचा आरक्षणासाठी विराट मोर्चा; जालना आणि बीडमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन… एक महिन्यात अनुसूचित जमातीचे लाभ द्या अन्यथा मुंबई जाम करू!

हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून महिनाभरात आरक्षण देण्यात यावे, नसता मुंबई जाम करण्यात येईल, असा इशारा बंजारा महामोर्चाच्या वतीने देण्यात आला. अखिल भारतीय बंजारा आरक्षण समिती आणि सकल बंजारा समाजाच्या वतीने जालना आणि बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी प्रचंड महामोर्चा काढण्यात आला. भर पावसात या मोर्चामध्ये बंजारा बांधव लाखोंच्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही शहरांत कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
आंध्र प्रदेश, तेलंगणामध्ये बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्यात आले आहे. महाराष्ट्रातही हैदराबाद गॅझेट आधार मानून बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमधून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी जालना आणि बीडमध्ये बंजारा समाजाच्या वतीने महामोर्चा काढण्यात आला.
सर्व स्तरांतून पाठिंबा…!
बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी काढण्यात आलेल्या जालन्यातील मोर्चाला मराठा समाजातील संघटना, धनगर समाज, भगवान सेवा संघ, कैकाडी समाज, जोशी-यज्ञेकर समाज, मजदूर संघासह विविध संस्था, संघटनांनी पाठिंबा दिला.
वंजारा आणि बंजारा एकच, धनंजय मुंडे यांचे नवे संशोधन
बीड येथे बोलताना अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांनी वंजारा आणि बंजारा समाज एकच असल्याचे विधान केले. यामुळे बंजारा समाजामध्ये असंतोष पसरला असून मुंडे यांनी आपले विधान मागे घ्यावे, अशी मागणी होत आहे.
Comments are closed.