आंदोलन चिरडण्यासाठी सरकारची दडपशाही! कोकणातील शेतकऱ्यांचा धडक मोर्चा, विनायक राऊत, राजू शेट्टी यांना फरफटत नेले; महादेव जानकर, हर्षवर्धन सपकाळ यांना उचलले

कोकणातील आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज मुंबईत धडक मोर्चा काढला. गिरगाव चौपाटी येथून मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानाच्या दिशेने मोर्चा निघत होता. तत्पूर्वीच सरकारने हे आंदोलन चिरडण्यासाठी दडपशाही केली. मोर्चाचे नेतृत्व करणारे शिवसेना नेते विनायक राऊत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना पोलिसांनी अक्षरशः फरफटत ताब्यात घेतले. राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना उचलून गाडीत कोंबले. शेकडो मोर्चेकऱ्यांना विविध भागांतून अटक करण्यात आली. कोकणातील शेतकऱयांच्या मोर्चावर सरकारने केलेल्या या अत्याचाराचा सर्वत्र निषेध होत आहे.

अवकाळी पावसामुळे कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र सरकारने हेक्टरी फक्त 22 हजार रुपयांची तुटपुंजी मदत जाहीर केली आहे. त्यामुळे बागायतदार आणि उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आणि संताप आहे.

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना आंब्यासाठी हेक्टरी पाच लाख आणि काजूसाठी तीन लाख रुपये नुकसानभरपाई मिळावी तसेच एनडीआरएफच्या मदतीसह कर्जमाफीचा लाभ मिळावा अशी त्यांची मागणी आहे. या मागणीसाठी ते आज वर्षा बंगल्यावर मोर्चाने धडकणार होते. दुपारी 1 वाजल्यापासून या मोर्चासाठी शेतकरी व बागायतदार गिरगाव चौपाटी येथे जमा होत होते.

आंबा-काजूला भाव मिळालाच पाहिजे

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर गिरगाव चौपाटीपासून वर्षा बंगल्यापर्यंतच्या रस्त्यावर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गिरगाव चौपाटी येथे आंदोलक जमा होताच पोलिसांनी मोर्चाला परवानगी नसल्याचे सांगत धरपकड सुरू केली. यावेळी आंदोलकांनी आंब्याला भाव मिळालाच पाहिजे, काजूला भाव मिळालाच पाहिजे, देता का जाता, अशा जोरदार घोषणा दिल्या.

शिवसेना नेते विनायक राऊत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, रासप नेते महादेव जानकर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना मंत्रालयाजवळील शिवसेनेच्या शिवालय संपर्क कार्यालय येथून गिरगाव चौपाटीकडे रवाना होण्यापूर्वीच ताब्यात घेण्यात आले. त्यात शिवसेना विभागप्रमुख संतोष शिंदे, अरुण दुधवडकर आदींचाही समावेश होता.

आझाद मैदानात झालेल्या आंदोलनात शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, शिवसेना उपनेते-आमदार मनोज जामसुतकर, आमदार महेश सावंत, अनंत (बाळा) नर, शिवसेना उपनेते अरुण दुधवडकर, दिवाकर देव, नगरसेविका श्रद्धा जाधव, विभागप्रमुख संतोष शिंदे, सुरेश पाटील, संतोष राणे, भाऊ कोरगावकर, बाजीराव मालुसरे, युगंधरा साळेकर, शिवसेना सचिव-नगरसेवक साईनाथ दुर्गे, माजी आमदार व आंबा बागायतदार संघटनेचे बाळ माने, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे प्रकाश रेड्डी, विधानसभाप्रमुख गोपाळ शेलार, उपविभागप्रमुख गजानन चव्हाण, म्युनिसिपल कर्मचारी सेनेचे बाबा कदम, अयोध्या पौळ यांच्यासह कोकणातील शेतकरी उपस्थित होते.

सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी आंदोलकांनी गळ्यामध्ये आंब्याच्या माळा घातल्या होत्या. लोकशाही मार्गाने आंदोलन होऊ न देता तत्पूर्वीच पोलिसांकडून झालेल्या धरपकडीचा आंदोलकांनी तीव्र निषेध नोंदवला.

सरकारला परिणाम भोगावे लागतील – राजू शेट्टी

‘गेल्या दोन महिन्यांपासून कोकणातील शेतकरी आंदोलन करत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तीन-चार वेळा कोकणात येऊन गेले, परंतु शेतकऱ्यांचे साधे निवेदनही त्यांनी स्वीकारले नाही. गेल्या 50 वर्षांत कोकणातील शेतकरी पहिल्यांदाच न्यायासाठी मुंबईत आला होता. मात्र गिरगाव चौपाटीवरच पोलिसांनी दमदाटी, धक्काबुक्की करत सर्वांना ताब्यात घेतले. त्याचे परिणाम महायुती सरकारला भोगावे लागतील.’ असा संताप राजू शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केला.

न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही – विनायक राऊत

आंबा काजू उत्पादकांच्या मागणीसाठी आम्ही वर्षावर जाणार होतो. गिरगाव चौपाटीवरील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला अभिवादन करून शांतपणे आम्ही जाणार होतो आणि आमच्या मागण्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर ठेवणार होतो. परंतु कोकणवासीयांना सामोरे जाण्याऐवजी फडणवीस यांच्या पोलिसांनी जबरदस्तीने पकडून आझाद मैदानात आणले. काहींना डोंगरी येथील तुरुंगात नेऊन डांबले. पण कोकणातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा इशारा यावेळी विनायक राऊत यांनी दिला.

आंदोलन सुरूच राहील – अरविंद सावंत

आज आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सरकारने केला असला तरी कोकणातील शेतकऱयांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. यापुढे कुठे आंदोलन होणार हे सरकारला सांगणारही नाही, असा इशारा यावेळी शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत यांनी दिला.

Comments are closed.