सानपाड्यातील हॉटेलमध्ये सिलिंडरचा भीषण स्फोट, दोन कामगार गंभीर जखमी
सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू असतानाच सानपाडा परिसर आज भीषण धमाक्याने हादरला. सेक्टर १ मधील वडापाव आणि समोशाच्या एका हॉटेलमध्ये सकाळी सहाच्या सुमारास सिलिंडरचा मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की हॉटेल पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन आसपासच्या दुकानांचे शटर उडून पडले. रस्त्याच्या पलीकडे असलेल्या सूरज रुग्णालयाच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. स्फोटामुळे सुमारे दीड किलोमीटरचा परिसर हादरला. या स्फोटात हॉटेलमध्ये काम करणारे दोन कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांना नवी मुंबई पालिकेच्या वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सानपाडा येथील सेक्टर १ मध्ये प्लॉट क्रमांक चारवर उभ्या असलेल्या प्रतीक सोसायटी या इमारतीच्या तळमजल्यावर यादव बटाटा वडा आणि समोसा या हॉटेलमध्ये आज सकाळी खाद्यपदार्थ तयार करण्याचे काम सुरू होते. त्याचवेळी एका सिलिंडरमधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर हॉटेलमध्ये काम करणारे मनीष यादव आणि अर्जुन यादव यांनी बाहेर निघण्यासाठी हॉटेलचे शटर उघडले. मात्र तितक्यात मोठा धमाका झाला. यात मनीष ६५ टक्के तर अर्जुन ८५ टक्के भाजला. स्फोटामध्ये संपूर्ण हॉटेल उद्ध्वस्त झाले. हॉटेलमधील सामान थेट रस्त्यावर फेकले गेले. या हॉटेलच्या शेजारी असलेल्या अन्य दुकानांचे शटर उडाले. स्फोट झालेल्या हॉटेलच्या समोर रस्ता आणि उड्डाणपूल आहे. त्यानंतर रस्त्याच्या पलीकडे असलेल्या सूरज रुग्णालयाच्या इमारतीच्या खिडकीच्या काचा फुटल्या.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी घाव घेतली. दोन्ही जखमी कामगारांना तातडीने नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Comments are closed.