५०० चौरस फुटाची घरे द्या, झोपडपट्टीवासीयांचे धारावीतच पुनर्वसन करा! रणरणत्या उन्हात हजारो धारावीकरांचा आक्रोश मोर्चा
‘धारावी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची,’ ‘अदानी हटाव, धारावी बचाव’ अशा घोषणा देत आज हजारो धारावीकरांनी आज भव्य मोर्चा काढला. मुंबईच्या रणरणत्या उन्हाचीही पर्वा न करता धारावीकर रस्त्यावर उतरले. सर्व पात्र-अपात्र रहिवाशांना धारावीतच ५०० चौरस फुटांची घरे मिळावीत आणि कोळीवाड्यांना या पुनर्विकास प्रकल्पातून वगळावे, या प्रमुख मागण्यांसाठी आज धारावीकरांनी मोर्चा काढला. कुंभारवाडा येथून सुरू झालेला हा मोर्चा पोलिसांनी अडवला. त्यानंतर शिष्टमंडळाने धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी शिवसेना नेते – खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते अंबादास दानवे, आमदार महेश सावंत, माजी आमदार बाबुराव माने उपस्थित होते. धारावी बचाव आंदोलनाच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), काँग्रेस राजकीय पक्षांचे नेते, आप, सपा, बसपा, भाकप अशा राजकीय पक्षांच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांसह विविध संघटनांचे कार्यकर्ते आणि हजारो रहिवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या आहेत प्रमुख मागण्या
अदानी समूह आणि राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा करूनही रहिवाशांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. यावेळी आंदोलकांनी खालील प्रमुख मागण्या मांडल्या:
- ५०० चौरस फुटांचे घर – प्रत्येक झोपडीधारकाला ५०० चौरस फुटांचे हक्काचे घर मिळावे.
- धारावीतच पुनर्वसन – कोणत्याही रहिवाशाला धारावीच्या बाहेर हलवू नये, सर्वांचे पुनर्वसन याच परिसरात व्हावे.
- कोळीवाड्यांचे संरक्षण – धारावीतील कोळीवाडे हे मुंबईचे मूळ अस्तित्व आहेत. त्यांची संस्कृती आणि व्यवसाय जपण्यासाठी त्यांना या प्रकल्पातून पूर्णपणे वगळण्यात यावे.
Comments are closed.