मध्यरात्री इमारतीत आगडोंब; चौघे थोडक्यात बचावले

शीळ परिसरातील चार मजली इमारतीत मध्यरात्री आगडोंब उसळला होता. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील एका रूममध्ये लागलेली ही आग इतकी भीषण होती की या आगीने काही क्षणातच घरातील सर्व साहित्य भक्ष्य केले. यावेळी घरातील रहिवाशांनी वेळीच बाहेर पळ काढल्याने सुदैवाने ते बचावले.
शीळ भागातील तळ अधिक चार मजली इमारतीतील रूम नंबर 303 मध्ये पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. घरातील भाडोत्री निलोफर शेख त्यांची आई आणि दोन मुलांसोबत वेळीच घरातून बाहेर पडल्याने कोणालाही दुखापत झालेली नाही. या आगीमुळे घरातील टीव्ही, फ्रीज, ओव्हन, सोफा, वॉशिंग मशीन व इतर साहित्य जळून खाक झाले आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Comments are closed.