‘जमीन आमच्या हक्काची’ म्हणत ग्रामसभेवर ग्रामस्थांचा बहिष्कार, वाटद एमआयडीसी रेटण्याचा कुटील डाव उधळला

रत्नागिरी तालुक्यात वाटद एमआयडीसी होऊच द्यायची नाही असा चंग ग्रामस्थांनी बांधला आहे. वाटद एमआयडीसी शेतकऱ्यांच्या माथी मारण्यासाठी वाटद ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत एमआयडीसी समर्थनाचा ठराव करण्याचा डाव ग्रामस्थांनी हाणून पाडला. जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची म्हणत ग्रामस्थांनी ग्रामसभेवर बहिष्कार टाकला. गदारोळ झाल्यामुळे वातावरण तापले होते.

वाटद एमआयडीसी रेटण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे.२ हजार २०० एकर जमिनीवर एमआयडीसीचा डोळा आहे. त्यापैकी एक हजार एकर जमीन रिलायन्स डिफेन्सला देण्यात येणार आहे. उर्वरित बाराशे एकर जमिनीचे काय करणार हे गुलदस्त्यात आहे. स्थानिक ग्रामस्थांसह चाकरमान्यांनी वाटद एमआयडीसीला विरोध केलेला आहे. अशावेळी एमआयडीसी,जिल्हा प्रशासन आणि भूमाफिया वाटद एमआयडीसीला समर्थन दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. १७ ऑगस्ट चाकरमानी दादर मध्ये आपली ताकद दाखवून एमआयडीसी रेटणाऱ्या सरकारच्या डोळ्यात अंजन घालणार आहेत.

वाटद एमआयडीसीच्या समर्थनाचा ठराव वाटद ग्रामपंचायतमध्ये करण्याचा कुटील डाव आखण्यात आला होता. मात्र ग्रामस्थ मोठ्या संख्येने ग्रामसभेत पोहचले आणि त्यांनी जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, अशा घोषणा देत ग्रामसभेवर बहिष्कार घातला. जोरदार घोषणा देत ग्रामस्थ बाहेर पडले तेव्हा तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

Comments are closed.