माथेरानमधील ७४ हात रिक्षाचालक ओढताहेत अमानवी जोखड, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही ई-रिक्षा मिळेनात

सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानंतरही निसर्गरम्य माथेरानमधील ७४ हात रिक्षाचालक जोखडात रखडले आहेत. त्यांना अजूनही ई-रिक्षा न मिळाल्यामुळे अमानवी मेहनत करावी लागत आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर सहा महिन्यांच्या आत हात रिक्षाचालकांना अत्याधुनिक ई-रिक्षा मिळणे अपेक्षित होते, पण सनियंत्रण समितीने चालढकल केल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. त्याचा फटका पर्यटक तसेच स्थानिकांनाही बसला आहे.
माथेरानमधील अमानवी परंपरा नष्ट व्हावी यासाठी ई-रिक्षांचा प्रस्ताव आला होता. न्यायालयाच्या आदेशानंतर प्रायोगिक तत्त्वावर या रिक्षा चालवण्यात आल्या. हा प्रयोग यशस्वी झाला नाही तर सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांनी माथेरानमधील सर्व हात रिक्षाचालकांना ई-रिक्षा द्यावी असे आदेश ६ ऑगस्ट रोजी दिले होते, पण चार महिने उलटून गेले तरीही त्याची अंमलबजावणी अजूनपर्यंत झाली नाही. न्यायालयाच्या आदेशानंतरही हातरिक्षाचालकांना ई रिक्षा न मिळाल्याने आणखी किती प्रतीक्षा करायची असा सवाल करण्यात येत आहे.
पर्यटक, स्थानिकांचे हाल
माथेरानमध्ये एकूण ९४ हात रिक्षाचालक असून त्यापैकी फक्त २० जणांनाच ई-रिक्षा मिळाल्या आहेत. त्यातील केवळ १५ ई-रिक्षा प्रत्यक्षात रस्त्यावर धावतात. अन्य रिक्षा या दुरुस्ती व इतर कारणांमुळे गॅरेजमुळे पडून आहेत. माथेरानमध्ये दर शनिवारी, रविवारी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात, पण ई-रिक्षा कमी असल्यामुळे त्यांची मोठी गैरसोय होते. स्थानिक नागरिक, पर्यटक तसेच विद्यार्थ्यांनाही ई-रिक्षांअभावी रोज पायपीट करावी लागत आहे.

Comments are closed.