रस्ता दुरुस्ती की थुकपट्टी? माथेरानच्या घाटात पर्यटकांची घसरगुंडी, निकृष्ट कामामुळे वाहने घसरली

थर्टी फर्स्टचे वेध लागले असल्याने अनेक पर्यटकांनी यंदा माथेरानला अधिक पसंती दिली आहे. नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी हॉटेलचे बुकिंगदेखील करण्यात आले असून सारे काही प्लॅनिंग तयार आहे. पण थर्टी फर्स्टसाठी तुम्ही कारने येणार असाल तर जरा सावधान… कारण माथेरानाचा घाट सध्या ‘मृत्यूची वाट’ बनला आहे. मंगळवारी दिवसभर नेरळ-माथेरान दरम्यानच्या घाट रस्त्यांवर दुरुस्तीचे काम करण्यात आले. त्यावर लाखो रुपयांची उधळपट्टी झाली. पण दुरुस्तीची ही मलमपट्टी आहे की थुकपट्टी, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. निकृष्ट कामामुळे आज अनेक पर्यटकांची वाहने घसरली. खड्डे नीट न भरल्यामुळे अपघाताला आमंत्रण मिळणार आहे. त्यामुळे थर्टी फर्स्टसाठी येताना जरा बचके रहेना…

सध्या नाताळची सुट्टी लागली असून बच्चे कंपनीला घेऊन पालक ‘जीवाचे माथेरान’ करण्यासाठी येत आहेत. त्यांचा प्रवास सुखकारक व्हावा म्हणून हायब्रीड अॅन्युटी या संस्थेच्या ठेकेदारामार्फत घाईने डांबर व खडी टाकून खड्डे बुजवण्यात आले. या कामासाठी मंगळवारी रात्री ९ ते आज पहाटे पाच वाजेपर्यंत घाट रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. हा रस्ता एमएसआरडीसी अंतर्गत असून त्याची देखभाल व्यवस्थित होत नसल्याने दरवर्षी पर्यटकांना अनेक अडचणींचा सामना करून माथेरान गाठावे लागते. जुम्मापट्टी, एस टन व पिटकर पॉईंट तसेच दस्तुरी चांगभले परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून रस्ता खड्यात की खड्डा रस्त्यात अशी भीषण परिस्थिती होती.

काही तासांतच फोलपणा उघड झाला

रस्त्याची अवस्था मंगळवारी केलेल्या कामामुळे काहीशी बदलेलअशी आशा होती. पण प्रत्यक्षात आजची सकाळ उजाडताच रस्त्याच्या कामाचा फोल पणा उघड झाला. अनेक गाड्या रस्त्यांवरून घसरत असल्याचे दिसून आले. त्यामुळे नेमकी रस्त्यांची काय दुरुस्ती केली, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अनेक दुचाकी, चारचाकी व अवजड वाहने रस्त्यातच अडकली. त्यामुळे माथेरानला जाणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड झाला. दरम्यान आमचा रस्ता होता तसाच करून द्या, पण लोकांचे जीव धोक्यात घालू नका, असे सामाजिक कार्यकर्ते व टॅक्सीचालक सनी चंचे यांनी दैनिक ‘सामना’ शी बोलताना सांगितले.

Comments are closed.