कसोटी मालिकेत हिंदुस्थानचीच सरशी! माजी धडाकेबाज फलंदाज मॅथ्यू हेडनचे भाकीत

जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या 2025 ते 2027 या नव्या हंगामाला हिंदुस्थान व इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेने प्रारंभ होतोय. त्याचबरोबर या मालिकेचे ‘माइंड गेम’सुद्धा सुरू झाले असून, ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मॅथ्यू हेडनने ‘ही मालिका हिंदुस्थानच जिंकणार,’ असे भाकीत वर्तवीत आपले हिंदुस्थानप्रेम दाखवलेय. दुसरीकडे ऑ स्ट्रेलियाचाच माजी कर्णधार मायकल क्लार्क, तसेच दक्षिण आफ्रिकन वेगवान गोलंदाज डेल स्टेनने ही मालिका अत्यंत थरारक होणार व यात इंग्लंड 3-2ने हिंदुस्थानवर मात करणार, अशी भविष्यवाणी वर्तवीत मालिकेचे वातावरण तापविले आहे.

नुकत्याच जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा मान दक्षिण आफ्रिकेने मिळवीत 2023-2025 या हंगामाचा शेवट केला. आता येत्या 20 जूनपासून लीड्स येथे हिंदुस्थान आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला प्रारंभ होत असून, या कसोटीने 2025-27 या कसोटी अजिंक्यपदाच्या नव्या हंगामाचाही प्रारंभहोतोय, उभय संघांची गेल्या वर्षभरातील कसोटी कामगिरी फारशी समाधानकारक नव्हती. हिंदुस्थानी संघ तर गेल्या आठ कसोटींपैकी सहा कसोटींत दारुणरीत्या हरलाय. केवळ एकाच कसोटीत त्यांना विजय मिळविता आला होता. दुसरीकडे इंग्लंड गेल्या दोन मालिकांपैकी (पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध) एक मालिका हरलाय, तर दुसरी जिंकलाय. याचाच अर्थ इंग्लंडची कामगिरी हिंदुस्थानपेक्षा काही प्रमाणात समाधानकारक आहे.

त्यामुळे आगामी मालिकेबाबत क्रिकेटतज्ज्ञांची मतेही विभागली आहेत. इंग्लंडचा संघ मायदेशात खेळत असला, तरी नव्या दमाचा हिंदुस्थानी संघच यजमानांवर मात करून मालिकेत ३-२ अशी बाजी मारेल, असा अंदाज हेडनने व्यक्त केला. जेम्स अॅण्डरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड हे दोन्ही महान गोलंदाज निवृत्त झाल्याने इंग्लिशची गोलंदाजी काही कमकुवत झाल्याचे मत त्याने बोलून दाखविले.

मांजरेकर-दासगुप्ता म्हणाले, हिंदुस्थान हरणार!

हेडनने हिंदुस्थानच्या बाजूने आपला कौल दिला असला, तरी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने ‘आगामी मालिका अत्यंत चुरशीची होईल, हिंदुस्थानी संघ दोन सामनेही जिंकेल; पण मालिकेत यजमान इंग्लंडचा संघ 3-2ने यश मिळवेल,’ असे भाकीत वर्तविले आहे. त्याचप्रमाणे आफ्रिकन वेगवान गोलंदाज डेल स्टेननेही आपले मत इंग्लंडच्या पारड्यात 3-2 असे टाकलेय. एवढेच नव्हे, तर संजय मांजरेकर आणि दीप दासगुप्ता यांनी ‘नव्या दमाचा हिंदुस्थानी संघ इंग्लंडला जबरदस्त झुंजवेल. प्रत्येक कसोटीत क्रिकेटप्रेमींना थराराची अनोखी मेजवानी अनुभवायला मिळेल; पण इंग्लंडचा संघ आपल्या घरच्या मैदानात खेळत असल्यामुळे या मालिकेत त्यांचे पारडे किंचित जड असून, मालिकेत ते विजयी ठरतील,’ अशी भविष्यवाणी करीत दोघांनी हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींना धक्का दिला आहे.

Comments are closed.