बलात्कार प्रकरणात मौलानाला अटक

वृत्तसंस्था/ लखनौ

एका 14 वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका मुस्लीम मौलानाला अटक करण्यात आली आहे. या मौलानाने बलात्कार केल्याने ती अल्पवयीन मुलगी गर्भवती झाल्यानंतर तिने एका अर्भकाला जन्म दिला. यानंतर या मुलीच्या पालकांनी पोलिसात तक्रार सादर केली. पोलिसांनी या मौलानाला अटक केली असून पुढील तपास हाती घेण्यात आल्याची माहिती आहे.

या प्रकरणातील आरोपीचे नाव मौलाना इस्लाम असे आहे. त्याच्या घराच्या शेजारी राहणाऱ्या मुलीवर त्याने बलात्कार केला असा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बलात्काराच्या कृत्यानंतर धमकी देऊन त्याने तिचे तोंड बंद ठेवले होते. या मुलीला ती गर्भवती आहे, याची जाणीवही नव्हती. अचानक कळा येऊ लागल्याने 14 फेब्रुवारीला तिला रुग्णालयात नेण्यात आले. ती गर्भवती असल्याचे नंतर तिच्या आईवडिलांच्या लक्षात आले. तिने एका अर्भकाला जन्म दिल्यानंतर या मौलानाचे नाव स्पष्ट केले. त्यानंतर पोलिसांमध्ये तक्रार सादर करण्यात आली.

पिलखुवा कोतवालीची घटना

ही गंभीर घटना पिलखुवा कोतवाली या खेड्यात घडली आहे. या पिडीत मुलीचे वडील मजूर आहेत. पोलिसांना या मुलीने या मौलानाचे नाव सांगितल्यानंतर कारवाई करण्यात आली. घरात एकटी असताना हा मौलाना या मुलीवर वारंवार बलात्कार करीत होता आणि या प्रकारची वाच्यता केल्यास गंभीर परिणाम होतील, अशी धमकी देत होता. भीतीपोटी पिडीत मुलीने हा प्रकार आपल्या आई-वडिलांनाही सांगितला नव्हता, असे तिच्या पित्याने तक्रारीत स्पष्ट केले आहे.

Comments are closed.