मायावती पुन्हा पुतण्याला मोठी जबाबदारी देते
मुख्य राष्ट्रीय समन्वयकपदी नियुक्ती
वृत्तसंस्था/ लखनौ
बसपा सुप्रीमो मायावती यांनी पुन्हा एकदा आपला भाचा आकाश आनंदवर मोठी जबाबदारी सोपवली आहे. आकाशला मुख्य राष्ट्रीय समन्वयक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. पक्षामध्ये या पदाला दुसऱ्या क्रमांकाचे स्थान असल्यामुळे मायावतींनंतर आता आकाश आनंद यांना पुन्हा एकदा मानाचे स्थान मिळालेले दिसून येत आहे. अलिकडेच मायावती यांनी आकाश आनंद यांना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवला होता. मात्र, पुन्हा मानाचे पद दिल्यामुळे काही नेते-कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटलेला दिसत आहे.
बसपा सुप्रीमो मायावती यांनी लखनौ येथील बसपा कार्यालयात देशभरातील बसपा नेते आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. बैठकीत अनेक मुद्यांवर चर्चा झाल्यानंतर आकाश आनंद यांची पुन्हा मुख्य राष्ट्रीय समन्वयक म्हणून नियुक्ती केल्याने राजकीय खळबळ उडाली आहे. बहुजन समाज पक्षातील सर्व उलथापालथीनंतर आकाश आनंद यांना पुन्हा पक्षात सामील करण्यात आले. बसपामध्ये एकूण 5 राष्ट्रीय समन्वयक असून ते आता आकाश आनंद यांना रिपोर्ट करतील. कारण ते आता मुख्य राष्ट्रीय समन्वयक बनले आहेत.
बैठकीत इतर विषयांवरही चर्चा
रविवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत भारतीय सैन्याने दहशतवादाविरुद्ध केलेल्या कारवाईचे कौतुक करण्यात आले. बसपाने पहलगाम हल्ल्याला पाकिस्तान पुरस्कृत म्हटले आहे. दहशतवादाच्या नावाखाली पुन्हा एकदा पाकिस्तान आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना भारतात अस्थिरता पसरवण्याचा कट रचत असल्याचा आरोपही करण्यात आला. तसेच 29 मे रोजी ‘मतदार दिना’निमित्त देशभरात एक व्यापक जनसंपर्क मोहीम सुरू करण्याची घोषणा पक्षाने केली आहे. या मोहिमेंतर्गत सामान्य जनतेला दहशतवादाचे धोके आणि सुरक्षा आव्हानांची जाणीव करून दिली जाणार आहे.
Comments are closed.