‘असेन मी नसेन मी’ नाटकाला तीन पुरस्कार; प्रेमगीतांच्या सुरेल मैफलीत रंगला ‘माझा पुरस्कार’ सोहळा

मराठी-हिंदी प्रेमगीतांची सुरेल मैफल, त्यात रंगलेले ज्येष्ठ कलावंत-रंगकर्मी, सोबत शाब्दिक फटकेबाजी आणि हशा-टाळय़ांचा गजर अशा वातावरणात यंदाचा अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतील ‘माझा पुरस्कार’ सोहळा रंगला. यावेळी ‘असेन मी नसेन मी’ नाटकाला तीन पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
‘माझा पुरस्कार’चा दिमाखदार सोहळा बुधवारी शिवाजी मंदिरमध्ये झाला. सोहळय़ात लेखक-अभिनेता संदेश कुलकर्णी लिखित आणि अभिनेत्री अमृता सुभाष दिग्दर्शित ‘असेन मी नसेन मी’ला सर्वोत्कृष्ट नाटक, सर्वोत्कृष्ट नाटककार म्हणून संदेश कुलकर्णी यांना आणि याच नाटकातील दुहेरी भूमिकेसाठी अभिनेत्री शुभांगी गोखले यांना पुरस्कार मिळाला. निवृत्त न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी, नाटककार प्रशांत दळवी, शीतल तळपदे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. ‘माझा पुरस्काराची ही पांढरी बाहुली म्हणजे मुळ्ये काकांच्या शुभ्र कपडय़ांसारखीच स्वच्छ आणि साधी असून पुढील अनेक वर्षे ही बाहुली आपणांस मिळण्यासाठी नाटय़ कलावंत धडपडतील. कारण हा बहुमान जास्त महत्त्वाचा वाटतो,’ असे मनोगत पुरस्कारप्राप्त कलावंतांनी व्यक्त केले. यावेळी जयंत पिंगुळकर, केतकी भावे-जोशी, शिल्पा मालंडकर, मंदार आपटे यांनी विविध मराठी, हिंदी प्रेमगीते सादर केली. त्यावर ज्येष्ठ रंगकर्मी आणि कलाकारांनी ठेका धरला.
‘माझा पुरस्कार’ चे हे 19 वे वर्ष असून या माध्यमातून आपण विविध क्षेत्रांतील निरपेक्ष वृत्तीने आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करतो. गेल्या काही वर्षांत विविध सामाजिक उपक्रम राबवत आहोत. विविध स्तरातील लोकांनी या उपक्रमांसाठी स्वतःहून यथाशक्ती हातभार लावल्यामुळे गरजू लोकांना मदत झाली. – अशोक मुळ्ये
R षिकेश शेलार, निहारिका राजदत्त यांना पुरस्कार
‘शिकायला गेलो एक’ या नाटकासाठी अभिनेता ऋषिकेश शेलार याला सर्वोत्कृष्ट अभिनेता, तर ‘उर्मिलायन’ या नाटकातील भूमिकेसाठी अभिनेत्री निहारिका राजदत्त हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. ‘उर्मिलायन’ नाटकाचे दिग्दर्शक सुनील हरिश्चंद्र यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, ‘ज्याची त्याची लव्ह स्टोरी’ नाटकासाठी संदेश बेंद्रे यांना सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार म्हणून पुरस्कार देण्यात आला. ‘पुनरुज्जीवित’ नाटक म्हणून स्वतंत्रपणे ‘पुरुष’ या नाटकाला सर्वोत्कृष्ट नाटक, दिग्दर्शक राजन ताम्हाणे यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि अभिनेता अविनाश नारकर यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता असे तीन पुरस्कार मिळाले.
Comments are closed.