एमबीबीएसच्या जागा 10,650 ने वाढल्या

41 नव्या वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी : एनएमसीने घेतला निर्णय

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून स्वातंत्र्यदिनी करण्यात आलेल्या 75 हजार नव्या वैद्यकीय जागा निर्माण करण्याच्या आश्वासनानुरुप राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) 2024-25 शैक्षणिक वर्षासाठी 10,650 नव्या एमबीबीएसच्या जागांना मंजुरी दिली आहे. यामुळे 2024-25 च्या शैक्षणिक वर्षासाठी एकूण एमबीबीएसच्या जागांची संख्या 1,37,600 होणार आहे. यात राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्थांच्या (आयएनआय) जागाही सामील आहेत. ही वृद्धी भारतात वैद्यकीय शिक्षणाची उपलब्धता वाढविण्याच्या एका व्यापक रणनीतिचा हिस्सा आहे. 41 नवी वैद्यकीय महाविद्यालये जोडली गेल्याने देशात वैद्यकीय संस्थांची एकूण संख्या 816 होणार आहे.

अंडरग्रॅज्युएड जागांच्या विस्तारासाठी 170 अर्ज प्राप्त झाले होते. यातील 41 शासकीय महाविद्यालयांचे तर 129 खासगी संस्थांचे होते, यातील एकूण 10,650 एमबीबीएस जागांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती एनएमसीचे प्रमुख डॉ. अभिजात शेट यांनी दिली.

पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी एनएमसीला नव्या आणि नुतनीकरणीय जागांसाठी 3,500 हून अधिक अर्ज प्राप्त झाले. आयोगाला जवळपास 5 हजार पीजी जागांच्या वृद्धीची अपेक्षा असून यामुळे देशभरात एकूण पीजी जागांची संख्या 67 हजार होणार असल्याचे डॉ. शेट यांनी सांगितले आहे.

कधी पूर्ण होणार प्रक्रिया?

यंदा यूजी आणि पीजी दोन्हींसाठीच्या जागांमध्ये एकूण वृद्धी जवळपास 15 हजारने होण्याची शक्यता आहे. परंतु अंतिम मंजुरी प्रक्रिया आणि समुपदेशनात काहीसा विलंब झाला आहे. या प्रक्रिया निर्धारित कालमर्यादेत पूर्ण केल्या जातील असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे. आगामी शैक्षणिक वर्षासाठी मान्यता, परीक्षा आणि सीट मॅट्रिक्स अनुमोदनांच्या  कार्यक्रमाचा एक आराखडा लवकरच प्रकाशित केला जाणार आहे. याचबरोबर 2025-26 साठी अर्ज पोर्टल नोव्हेंबरच्या प्रारंभी खुले केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

Comments are closed.