वानखेडेवर दिग्गजांना स्टॅण्डिंग ओवेशन; शरद पवार, अजित वाडेकर आणि रोहित शर्मा यांचा एमसीएने केला स्टॅण्डरूपी गौरव

हिंदुस्थानी क्रिकेट संघाला कॅरेबियन आणि इंग्रजांच्या भूमीवर पहिलावहिला कसोटी मालिका विजय मिळवून देणारे कर्णधार अजित वाडेकर, हिंदुस्थानी संघाला अवघ्या आठ महिन्यांत टी-20 वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देणारा विक्रमादित्य कर्णधार रोहित शर्मा आणि मुंबई, हिंदुस्थान आणि जागतिक क्रिकेटचे सर्वोच्च स्थान संपादत क्रिकेटला प्रगतीच्या यशोशिखरावर पोहोचवणाऱ्या शरद पवार यांना ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर आज स्टॅण्डरूपी मानाचा मुजरा देण्याचे सत्कार्य मुंबई क्रिकेट संघटनेने केले. हिंदुस्थानी क्रिकेटच्या या दिग्गजांना अवघ्या मुंबई क्रिकेटने स्टॅण्डिंग ओवेशन देत त्यांचा गौरव केला.

मुंबई क्रिकेट संघटनेने आज मुंबईसह हिंदुस्थानी क्रिकेटचे नाव उंचावणाऱ्या महान आणि दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या स्टॅण्डचा नामकरण सोहळा क्रिकेट क्षेत्रातील दिग्गज, महान खेळाडू, क्रिकेटप्रेमी आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. हिंदुस्थानला परदेशात जिंकण्याची सवय लावणारे कर्णधार असा लौकिक असलेल्या अजित वाडेकर यांच्या अतुलनीय कारकीर्दीचा गौरव करताना ग्रॅण्ड स्टॅण्डच्या लेव्हल चारचे ‘अजित वाडेकर स्टॅण्ड’ असे नामकरण केले तर एमसीए, बीसीसीआय आणि आयसीसी अशा तिन्ही क्रिकेट संघटनांचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या शरद पवार यांच्याही कार्याचा गौरव करताना ग्रॅण्ड स्टॅण्ड लेव्हल तीनला ‘शरद पवार स्टॅण्ड’ असे नाव दिले. तसेच सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असलेल्या ‘मुंबईचा राजा’ रोहित शर्माला दिवेचा पॅव्हेलियनच्या लेव्हल तीनला रोहित शर्मा स्टॅण्ड येथे षटकार ठोकण्याची संधी निर्माण करून दिली. त्याचप्रमाणे एमसीएचे दिवंगत अध्यक्ष अमोल काळे यांचे नाव एमसीए ऑफिस लाऊंजला देत त्यांच्याही कार्याचा गौरव एमसीएने आज दणदणीत सोहळ्याद्वारे केला.

क्रिकेटच्या पंढरीत लाखमोलाचे स्टेडियम उभारणार, नव्या स्टेडियमसाठी एमसीएला योग्य भूखंड देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

लॉर्ड्सला क्रिकेटची पंढरी म्हटले जात असले तरी वानखेडे स्टेडियम हीच खरी क्रिकेटची पंढरी आहे. कारण याच स्टेडियममध्ये क्रिकेटचा देव असलेल्या सचिन तेंडुलकरचा पुतळा आहे. याच स्टेडियममध्ये आजचा सोहळा होतोय ही खूप मोठी गोष्ट आहे. मुंबई आणि महाराष्ट्र हे क्रिकेटप्रेमींचे राज्य आहे. मुंबईचे क्रिकेट क्षेत्रातील योगदान तर सर्वांनाच माहीत आहे. या क्रिकेटच्या पंढरीत एक मोठे स्टेडियम व्हावे म्हणून मध्यंतरी अध्यक्ष अमोल काळे आणि अजिंक्य नाईक आले होते. मी आजच सांगतो तुम्ही मोठ्या स्टेडियमसाठी प्रस्ताव दिलात तर तुम्हाला राज्य सरकारकडून एक योग्य भूखंड उपलब्ध करून देऊ. जिथे एक लाखापेक्षा अधिक क्षमतेचे स्टेडियम उभारले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सोहळ्याप्रसंगी दिल्यामुळे एमसीएसह क्रिकेटप्रेमींनीही आतापासूनच लाखमोलाच्या स्टेडियमचे वेध लागले आहेत.

शरद पवारांचे क्रिकेट क्षेत्रात अतुलनीय कार्य

मुंबई नव्हे तर हिंदुस्थानी क्रिकेटला प्रगतिपथावर नेण्यात शरद पवारांचे कार्य अतुलनीय आहे. त्यांनी दिलेल्या योगदानामुळे आज हिंदुस्थानी क्रिकेट सर्वोच्च स्थानावर पोहोचलेय. त्यामुळे त्यांच्या कार्याचा गौरव करताना वानखेडे स्टेडियमवरील स्टॅण्डला शरद पवार यांचे नाव देण्याचा एमसीएचा निर्णय योग्य असल्याची भावनाही फडणवीस यांनी बोलून दाखवली.

कुटुंबीयांच्या उपस्थितीत नामकरण सोहळा

आज वानखेडेवर स्टॅण्डच्या नामकरण सोहळ्याला सर्व गौरवमूर्तींचे कुटुंबीय आवर्जून उपस्थित होते. अजित वाडेकरांच्या स्टॅण्डच्या नामकरण सोहळ्याला पत्नी रेखा वाडेकर यांच्यासह त्यांची कन्या आणि वाडेकरांचे बंधू उपस्थित होते. तसेच रोहित शर्माच्या स्टॅण्डच्या नावाच्या वेळी त्याचे आई-बाबा आणि पत्नी रितीका सजदेह उपस्थित होती. विशेष म्हणजे आपल्या मुलाचे नाव स्टेडियमला दिले जात असताना रोहितचे आई-बाबा अक्षरशः भारावले होते. सर्वात विशेष म्हणजे रोहितच्या स्टॅण्डचा सोहळा पाहण्यासाठी मुंबई इंडियन्सचे सर्व खेळाडूही वानखेडेवर उपस्थित होते.

उशिरा का होईना वाडेकरांना आज उत्तुंग शिखरासारखा मान मिळाला, पत्नी रेखा वाडेकरांच्या भावना

ज्या क्षणाची, ज्या मानाची, ज्या गौरवाची आम्ही अनेक वर्षांपासून वाट पाहत होतो. ज्या माणसाने मुंबईच्या आणि हिंदुस्थानच्या क्रिकेटसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, त्या माणसाचा अर्थात अजित वाडेकरांचा उशिरा का होईना सन्मान झाला. तोसुद्धा थेट उत्तुंग शिखरासारखा ग्रॅण्ड लेवल झाला, अशा भावना अजित वाडेकरांच्या पत्नी रेखा वाडेकरांनी व्यक्त केल्या. आजचा दिवस पाहून जुन्या क्रिकेटप्रेमींना नक्कीच आनंद वाटला असेल. त्यांची ही अनेक दिवसांपासूनची अपेक्षा होती ती आज एमसीएने पूर्ण केल्याचे त्या आवर्जून म्हणाल्या.

या स्टॅण्डचा स्वप्नातही विचार केला नव्हता – रोहित शर्मा

ज्या मुलाने मुंबईसाठी, देशासाठी क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पाहिले होते आणि ते स्वप्नही पूर्ण केले. पण ज्या वानखेडेवर खेळण्यात माझी कारकीर्द गेली त्या वानखेडेवर आपल्या नावाचा स्टॅण्ड असेल याचा मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. मी आता टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झालोय, पण देशासाठी वन डेत अजून खेळणार आहे. लवकरच या स्टेडियमवर स्वतःच्या स्टॅण्डसमोर मला खेळण्याची संधी मिळेल, पण त्याआधी मी येत्या 21 मे रोजी आयपीएलच्य सामन्यासाठी या वानखेडेवर उतरणार आहे. आजचा दिवस माझ्या आयुष्यातला संस्मरणीय दिवस आहे. क्रिकेटमधल्या महान खेळाडूंसह महान नेते असलेल्या शरद पवारांसह माझेही नाव पाहून खूप जबरदस्त वाटत असल्याची भन्नाट प्रतिक्रिया रोहित शर्माने आपल्या स्टॅण्डच्या नामकरण सोहळ्याप्रसंगी व्यक्त केली. तसेच रोहितने आपले नाव स्टॅण्डला दिल्याबद्दल मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अजिंक्य नाईक आणि पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानले.

Comments are closed.