दिवाळीपूर्वीच सोन्या-चांदीच्या दराचे फटाके; चांदीच्या दरात एका दिवसात 10 हजाराची वाढ

सोन्या-चांदीचे दर दररोज नवनवे उच्चांक गाठत आहे. या वर्षात सोन्या-चांदीच्या दरात जबरदस्त तेजी आली आहे. सोन्या-चांदीने 1 लाखाचा टप्पा याआधीच पार केला असून आता चांदीचे 2 लाखाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. तसेत आता दिवाळी आणि लग्नसराईचा हंगाम सुरू होणार आहे. या काळात हमखास सोन्या-चांदीची खरेदी करण्यात येते. मात्र, सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडल्याने आता सर्वसामान्य 9 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांकडे वळले आहेत. दिवाळीपूर्वीच सोन्या-चांदीच्या दराचे फटाके फुटत आहेत.

सोन्या-चांदीतील तेजी वायदे बाजाराप्रमाणे सराफा बाजारातही दिसून येत आहे. जागतिक अस्थिर परिस्थिती आणि शेअर बाजारातील दबावामुळे अनेक गुतंवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्या-चांदीकडे वळत आहेत. त्यामुळे मागणी वाढल्याने वायदे बाजारात सोन्याचे दर सातत्याने वाढत आहे. त्याचा परिणाम सराफा बाजारावरही दिसत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे जागतिक अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी काळात सोन्या-चांदीतील तेजी कायम राहण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

सराफ बाजारातही सोन्या आणि चांदीच्या दराने आजपर्यंतचा उच्चांक गाठला आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या आणि चांदीच्या दरामध्ये विक्रमी वाढ झाली आहे. चांदीने एका दिवसात तब्बल 10 हजाराची वाढ नोंदवली आहे. तर सोन्याच्या दरात 1800 रुपयांनी वाढ झाली आहे. सोन्याचे दर जीएसटी सह एक लाख 30 हजार रुपयांवर पोहोचले आहेत. तर बाजारात चांदीची मागणी वाढत आहे. मात्र, त्याप्रमाणात पुरवठा नसल्याने चांदीसाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. तसे काही ठिकाणी आगाऊ पैसेही घेतले जात आहेत. त्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह 1 लाख 94 हजार रुपयांवर पोहोचले असून चांदीच्या दराने नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. दिवाळीच्या तोंडावर चांदी दोन लाख रुपयांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. आगामी काळात सोन्या-चांदीच्या दरात तेजी राहण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

Comments are closed.