भारताकडून इराणला वैद्यकीय मदत

युद्धाच्या पार्श्वभूमीवर मदतीचा हात : इराणच्या दूतावासाकडून आभार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, तेहरान

इस्रायल-अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताने इराणला वैद्यकीय मदतीचा पहिला साठा पाठवला आहे. अत्यावश्यक औषधे आणि वैद्यकीय साहित्याचा समावेश असलेला हा साठा इराणच्या रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आला. भारतातील इराणच्या दूतावासाने या मदतीबद्दल भारतीय जनतेचे आभार मानले आहेत. पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि युद्धाच्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताने पुन्हा एकदा आपली मानवतावादी संवेदनशीलता दाखवून दिली आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणत्याही आपत्ती किंवा संकटाच्यावेळी भारताने अनेक देशांना मदतीसाठी पुढाकार घेतलेला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता आखातातील युद्धस्थितीमुळे सध्या बरेच नुकसान झालेल्या इराणलाही भारताने मदतीचा हात पुढे केला आहे. ही मदत यशस्वीरित्या पोहोचवण्यात आली असून, याला भारतातील जनतेचा पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. भारतीय दूतावासाने वैद्यकीय साहित्याच्या वितरणाचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. इराण आणि इस्रायल यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला असतानाच इस्रायली हल्ल्यांमध्ये अली लारीजानी आणि त्यांच्या मुलाच्या नुकत्याच झालेल्या हत्येमुळे या प्रदेशातील परिस्थिती आणखी चिघळली आहे. अशा आव्हानात्मक काळात भारताची वैद्यकीय मदत केवळ राजनैतिकच नव्हे, तर मानवतावादी दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

भारत सरकारने युद्धग्रस्त इराणला मदतीचा हात पुढे करताना तेहरानला वैद्यकीय मदतीची पहिली खेप पाठवली आहे. भारताने पाठवलेली जीवनरक्षक औषधे आणि वैद्यकीय उपकरणांची ही खेप इराणी रेड क्रेसेंट सोसायटीकडे अधिकृतपणे सुपूर्द करण्यात आली आहे. भारतातील इराणचे राजदूत मोहम्मद फतहली यांनी या संकटाच्या काळात मिळालेल्या मदतीबद्दल भारत सरकार आणि जनतेचे मन:पूर्वक आभार मानले. दिल्ली आणि तेहरान यांच्यातील संबंध अत्यंत महत्त्वाचे असल्याचे वर्णन करताना त्यांनी इराण भारताला एक ‘मित्र देश’ मानतो, असे म्हटले आहे. दोन्ही देशांचे हितसंबंध समान आहेत आणि अशा कठीण काळात एकमेकांना पाठिंबा दिल्याने परस्पर विश्वास अधिक दृढ होतो, असे ते पुढे म्हणाले.

इतर देशांच्या वृत्तीवर तीव्र टीका

राजदूत फतहली यांनी भारताची प्रशंसा करताना, मानवतावादी कारणास्तवही मदत देण्यास नकार देणाऱ्या देशांवर निशाणाही साधला. भारताने जहाजे आणि औषधांच्या स्वरूपात भरीव मदत केली असली तरी, इतर अनेक देशांनी आपला पाठिंबा काढून घेतला आहे. इराण या देशांना जोरदार प्रत्युत्तर देईल आणि लवकरच जगाला याची माहिती मिळेल, असा इशारा त्यांनी दिला.

भारतीय नागरिकांचे कौतुक

केवळ भारत सरकारच नाही, तर इराणमधील भारतीय नागरिकही इराणमधील बाधितांना मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. दूतावासाच्या म्हणण्यानुसार, अनेक भारतीयांनी मानवतावादी मदत पाठवण्यासाठी वारंवार विनंती केली होती. याला प्रतिसाद म्हणून, दूतावासाने एक बँक खाते सुरू केले, परंतु तांत्रिक अडचणींमुळे, ऑनलाइन हस्तांतरण आणि युपीआयद्वारे पेमेंट करण्यात सध्या अडचणी येत आहेत, असेही राजदुतांनी स्पष्ट केले. ऑनलाइन पेमेंटमधील तांत्रिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर इराणच्या दूतावासाने लोकांना सध्या डिजिटल पेमेंट टाळण्याचे आवाहन केले आहे. या संकटाच्या काळात इराणला मदत करू इच्छिणारे लोक नवी दिल्लीतील दूतावासात येऊन रोख स्वरूपात आपली देणगी जमा करू शकतात, असे सांगण्यात आले आहे.

Comments are closed.