ऑनड्युटी तंबाखू, गुटखा, खर्रा खाल्ला तर खबरदार! मीरा-भाईंदर, वसई-विरार आयुक्तालयाचे पोलिसांना कडक आदेश

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने आता पोलिसांच्या ऑनड्युटी व्यसनांवर थेट लगाम घातला आहे. कर्तव्यावर असताना पोलीस कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांनी तंबाखू, गुटखा, मावा, खर्रा यांसारख्या तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन तसेच मद्यपान केले तर खबरदार, असा कडक आदेश आयुक्तालयाने दिला असून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

आयुक्तालयाचे मुख्यालय व विशेष शाखा पोलीस उपआयुक्त संजयकुमार पाटील यांनी या यासंदर्भातील अधिकृत परिपत्रक जारी केले आहे. पोलीस अधिकारी आणि अंमलदार कर्तव्यावर असताना पोलीस दलाचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे कर्तव्य बजावताना त्यांच्या वर्तनातून पोलीस दलाची शिस्त आणि प्रतिमा दिसून येते. अशा परिस्थितीत तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन किंवा मद्यपान करणे हे अशोभनीय असून पोलीस खात्याच्या शिस्तीला धरून नसल्याचे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच या आदेशाची व्याप्ती केवळ पोलीस ठाण्यापुरती मर्यादित नसून शासकीय कार्यालये, पोलीस ठाणी, शासकीय वाहने आणि कर्तव्य बजावण्याच्या ठिकाणी तंबाखू, गुटखा, मावा, खर्रा यांसारख्या पदार्थांचे सेवन तसेच मद्यपान करण्यास मनाई करण्यात आली आहे.

काटेकोर अंमलबजावणी
आयुक्तालयाच्या अखत्यारीतील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी आणि विविध शाखांच्या अधिकाऱ्यांना या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांकडून या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळल्यास संबंधितांविरुद्ध तत्काळ खात्यांतर्गत कारवाई करण्याचे अधिकारही प्रभारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

Comments are closed.