Mega Block – पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक

पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे या दोन्ही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पूल क्रमांक 61 च्या पुनर्बांधणीच्या कामासाठी पश्चिम रेल्वे 28 मार्च 2026 रोजी रात्री 11.30 ते 29 मार्च 2026 रोजी सायंकाळी 7.30 वाजेपर्यंत कांदिवली आणि बोरिवली स्थानकांदरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गावर तसेच 29 मार्च 2026 रोजी पहाटे 1.00 ते पहाटे 4.30 वाजेपर्यंत डाउन फास्ट लाईनवर जंबो ब्लॉक आयोजित करणार आहे. तर विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांच्या अंमलबजावणीसाठी मध्य रेल्वेवर 29 मार्च 2026 रेजी उपनगरीय विभागात मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

ब्लॉक काळात पश्चिम रेल्वेवर गोरेगाव आणि बोरिवली दरम्यान सर्व धीम्या गाड्या जलद मार्गावर वळवण्यात येतील. ब्लॉक दरम्यान डाउन फास्ट लाईनवर प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्यामुळे, डाउन गाड्या 5 व्या मार्गावर धावतील आणि राम मंदिर, मालाड आणि कांदिवली स्थानकांवर थांबणार नाहीत.

ब्लॉक कालावधीत बोरीवली स्थानकावरील फलाट क्रमांक 1 आणि 2 वरून रेल्वेगाड्या धावणार नाहीत. काही उपनगरीय सेवा रद्द केल्या जातील किंवा अंधेरी आणि गोरेगाव स्थानकांवर अंशतः कमी अंतरावर थांबवल्या जातील. याव्यतिरिक्त, अंधेरी आणि बोरीवली दरम्यान दोन्ही दिशांना सर्व 15 डब्यांच्या धीम्या गाड्या जलद गाड्या म्हणून चालवल्या जातील.

मध्य रेल्वेवर माटुंगा – मुलुंड अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 पर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.14 ते दुपारी 3.32 दरम्यान सुटणाऱ्या डाउन धीम्या मार्गावरील गाड्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांवर थांबतील. त्यानंतर मुलुंड स्थानकापाशी त्यांना पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येईल आणि त्या नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिरा आपल्या गंतव्यस्थानी पोहोचतील.

ठाणे येथून सकाळी 11.07 ते दुपारी 3.51 या वेळेत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील गाड्या मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येईल. मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान या गाड्या मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे थांबतील. त्यानंतर माटुंगा स्थानकावर त्यांना पुन्हा अप धीम्या मार्गावर वळवण्यात येईल. यामुळे या गाड्या त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिरा आपल्या गंतव्यस्थानी पोहोचतील.

ट्रान्स-हार्बर मार्गावर ठाणे आणि वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 वाजेपर्यंत ट्रान्स-हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक कालावधीत वाशी / नेरुळ आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावरील गाड्या रद्द राहतील. ठाणे येथून सकाळी 10.35 ते सायंकाळी 4.07 वाजेपर्यंत वाशी / नेरुळ / पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन मार्गावरील सेवा, तसेच पनवेल / नेरुळ / वाशी येथून सकाळी 10.25 ते सायंकाळी 4.09 वाजेपर्यंत ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या अप मार्गावरील सेवा रद्द राहतील.

Comments are closed.