पुरुष साड्यात नाचतात …
नुकताच नवरात्रोत्सव पार पडला आहे. हा देशभरात भिन्न भिन्न स्वरुपांमध्ये साजरा केला जातो. हा उत्सव अनेक प्रथा आणि परंपरांचे प्रतीक आहे. गुजरातमध्ये एक परंपरा अशी आहे, की नवरात्रोत्सवात पुरुष महिलांची वेशभूषा करुन, अर्थात, साड्या नेसून आणि नटून थटून गर्बा खेळतात, ही परंपरा गेल्या 200 वर्षांपेक्षा अधिक काळ सातत्याने पाळली जात आहे. गुजरातमधील सर्वात मोठे शहर मानले गेलेल्या अहमदाबात परिसरात ही परंपरा पाळली जात आहे.
या परंपरेचा प्रारंभ कसा झाला, याची एक मनोरंजक कहाणी आहे. एका शापामुळे ही परंपरा निर्माण झाल्याची माहिती दिली जाते. 200 हून अधिक वर्षांपूर्वी एका मुस्लीम सरदारापासून वाचण्यासाठी सदुबेन नामक महिलेने गुजरातमधील बारोट समुदायाच्या पुरुषांचे साहाय्य मागितले होते. तथापि, या पुरुषांनी साहाय्य देण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या या महिलेने या परुषांना शाप दिला. तुम्ही सदाचे भित्रे व्हाल, असा तो शाप होता. ही शापवाणी उच्चारुन या महिलेने स्वत:चा सन्मान आणि शील वाचविण्यासाठी आत्महत्या केली. त्यामुळे या पुरुषांना पश्चात्ताप झाला. आपल्या चुकीचे प्रायश्चित्त घेण्यासाठी आणि सदुबेनचा सन्मान करण्यासाठी त्यांनी नवरात्रोत्सवात महिलांची वेषभूषा करुन गरबा नृत्यात भाग घेण्याचा निर्धार केला. तेव्हापासून पुरुषानी साड्या नेसून गरबा नृत्य करण्याची प्रथा निर्माण झाली असून ती आजही आचरणात आहे. ही परंपरा अत्यंत निष्ठेने पाळली जाते. 200 वर्षांपूर्वी सदुबेन नावाच्या महिलेला आपल्या पूर्वजांमुळे आत्महत्या करावी लागली, ही सल आजपर्यंतही या पुरुषांना लागून राहिली आहे. त्यामुळे सदुबेनच्या शापातून मुक्त होण्यासाठी ही प्रथा पाळली जाते. तरुण पुरुषही ती निष्ठेने नवरात्राचे 9 दिवस पाळत असतात.
Comments are closed.