मनोरुग्ण तरुणाचा दोन तास थरार, इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील सज्जावर चढून धुमाकूळ

दादर पूर्वेकडील रेल्वे स्थानकालगत आज सकाळी एका तरुणाने चांगलाच गोंधळ घातला. तो तेथील इमारतीच्या दुसऱया मजल्यावरील सज्जावर उतरून फिरू लागला. हा प्रकार कळताच नागरिकांनी पोलिसांना कळवले. पोलीस आणि सोबतीला अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचल्यावर त्यांनी त्याला खाली उतरविण्याचा कसोशीने प्रयत्न केला, पण तो तरुण काही ऐकत नव्हता. तो खाली पडेल आणि गंभीर दुखापत होईल अशी परिस्थिती होती, पण त्याला खाली उतरविल्यानंतर तो मनोरुग्ण असल्याचे समोर आले.
राजेशकुमार मुखिया (27) असे त्या तरुणाचे नाव आहे. मूळचा बिहारच्या बेगुसरायचा रहिवासी असलेला राजेशकुमार कुलाबा येथे त्याच्या भावाकडे आला होता. तो गुरुवारी भावाच्या बोरिवली येथील मित्राकडे गेला होता. बोरिवलीहून आज सकाळी तो दादर स्थानकात उतरला आणि दादर पूर्वेकडील स्थानकालगत असलेल्या प्रभात ह्यू या इमारतीच्या दुसऱया मजल्यावर चढला. तेथून तो इमारतीच्या बाहेरील बाजूस असलेल्या छोटय़ाशा सज्जावर उतरला. सज्जावरच तो चालू लागला. हा प्रकार नजरेस पडताच नागरिकांना लगेच पोलिसांना कळवले. त्यानुसार माटुंगा पोलीस व अग्निशमन दलाचे जवान तेथे पोहचले. वरिष्ठ निरीक्षक राजेश पवार, उपनिरीक्षक साईनाथ नरवडे, तसेच वैभव पाटील यांनी राजेशला खाली उतरण्यास विनंती केली. परंतु तो कोणाचेही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. तब्बल दोन तास तो सज्ज्यावरच होता. अखेर शिताफीने पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला पकडून सुखरूप तेथून खाली आणले. सकाळी 7.30 वाजता सुरू झालेले हे बचावकार्य 9.30 वाजता संपले.
लोक बघून बिथरला
सकाळी दादर रेल्वे स्थानकात उतरल्यावर समोरून येणाऱया प्रवाशांना बघून तो घाबरला. एवढय़ा संख्येने लोक आपल्या दिशेने येत असून ते आपल्याला मारणार अशी भीती वाटल्याने तो तेथून कसाबसा स्थानकाबाहेर पडला आणि लपण्यासाठी थेट प्रभात ह्यू इमारतीच्या दुसऱया मजल्यावरील सज्जावर जाऊन उतरला. राजेशकुमार हा मनोरुग्ण असून त्याला त्याचा भाऊ बिजश्वजीत मुखिया याच्या ताब्यात दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Comments are closed.