Mental Health : सोप्या टिप्सनी ओव्हरथिंकिंगवर करा मात
सध्याच्या काळात, अतिविचार करणे अर्थात ओव्हरथिंकिंग करणे ही एक सामान्य समस्या बनत चालली आहे. सतत एकाच गोष्टीचा विचार करत राहणे. यामुळे तुम्ही ओव्हरथिंकिंगचे बळी होऊ शकता. याचा अर्थ कोणत्याही घटनेबद्दल किंवा परिस्थितीबद्दल जास्त विचार करणे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे वर्तमानात जगण्याऐवजी भूतकाळ आणि भविष्याबद्दल विचार करणे. असं म्हटलं जातं की ‘वर्तमानात जगा’. याचा अर्थ उद्या काय होईल किंवा काल हे का घडले याचा विचार न करता जो आहे तो क्षण पूर्णतः जगणे. तुम्ही जितके जास्त वर्तमानात जगाल तितके तुमचे जीवन सोपे होईल आणि तुमचे मन शांत राहील. गरजेपेक्षा जास्त गोष्टींबद्दल विचार केल्याने मानसिक ताण, थकवा आणि मानसिक आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. ओव्हरथिंकिंगपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही कोणत्या पद्धती अवलंबू शकता हे आजच्या या लेखातून जाणून घेऊयात.
अतिविचारांना तोंड देण्याचे हे आहेत सर्वोत्तम मार्ग
वर्तमानावर लक्ष केंद्रित करा
अनेकदा तुम्ही पाहिले असेल की अनेक जण त्यांच्या भूतकाळाबद्दल किंवा भविष्याबद्दल विचार करत राहतात आणि ही गोष्ट इतकी मर्यादा ओलांडते की ते मानसिक आजारी पडतात. हे अतिविचाराने सुरू होते आणि ते हळूहळू नैराश्यात कधी बदलते हे तुम्हाला कळतही नाही. म्हणूनच नेहमी वर्तमानावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि तुम्ही सध्या जगत असलेला क्षण चांगला बनवला पाहिजे.
दीर्घ श्वास घ्या
जेव्हा जेव्हा तुम्हाला असे वाटेल की तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल जास्त विचार करत आहात आणि तणावग्रस्त आहात, तेव्हा स्वतःला शांत ठेवण्यासाठी, शांत ठिकाणी बसा आणि दीर्घ श्वास घ्या. तुम्हाला काही वेळातच शांत आणि बरे वाटू लागेल.
लोकांशी बोला
जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही जास्त विचार करत आहात तर त्याबद्दल दुसऱ्या कोणाशी तरी बोला आणि त्यांना तुमच्या भावना सांगा. यासाठी तुम्ही मित्र, कुटुंबातील सदस्य किंवा समुपदेशकाशी देखील बोलू शकता. यामुळे तुम्हाला बरे वाटेल.
शारीरिक हालचाली करतील मदत
जर तुम्हाला जास्त विचार करण्याचा त्रास होत असेल तर काही वेळ बाहेर फिरायला जा. निसर्गात तुम्हाला शांतता मिळेल कारण निसर्गात तुमचा वाईट मूड चांगला करण्याची शक्ती आहे. तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात ध्यान आणि योगाने करावी, यामुळे तुम्हाला या समस्येचा सामना करण्यास मदत होईल.
एक डायरी तयार करा
दररोज रात्री झोपण्यापूर्वी, तुम्हाला त्रास देणाऱ्या सर्व गोष्टी डायरीत लिहा आणि मग तुम्ही स्वतः त्या गोष्टींना कसे तोंड देऊ शकता ते पाहा. जरी ही गोष्ट खूपच लहान वाटत असली तरी तुमचा अतिविचार कमी करण्यास ती नक्कीच मदत करू शकेल.
हेही वाचा : Vastu Tips : व्यवसायाच्या भरभराटीसाठी वास्तू टिप्स
संपादित – तनवी गुडे
Comments are closed.