फुटबॉल स्टार मेस्सी पीएम मोदींना भेटणार! विराट, रोहित आणि धोनीसोबत भारतात खास सामना होण्याची शक्यता

लिओनेल मेस्सी (Lionel Messi) डिसेंबर महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. याबाबत आता अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे. अनेक वर्षांनंतर फुटबॉल स्टार मेस्सीला पुन्हा भारतात पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत. आता अशी चर्चा होत आहे की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांची व त्याची भेट होऊ शकते. त्याचबरोबर मेस्सीचा विराट, रोहित आणि धोनीसोबत विशेष सामना होणार असल्याची बातमी दोन आठवड्यांपूर्वी आली होती.

इव्हेंटचे प्रमोटर सतद्रु दत्ता यांनी पुष्टी केली आहे की, लिओनेल मेस्सीचा भारत दौरा 12 डिसेंबर 2025 पासून सुरू होणार आहे. तो भारतातील काही शहरांना भेट देणार असून 12 डिसेंबर रोजी तो कोलकात्यात दिसणार आहे. या टूरला “GOAT Tour of India 2025” असे नाव देण्यात आले आहे. त्यानंतर मेस्सी अहमदाबाद, मुंबई आणि नवी दिल्ली येथेही उपस्थित राहील. पीटीआयच्या रिपोर्टनुसार, 15 डिसेंबर रोजी नवी दिल्लीतील पंतप्रधानांच्या निवासस्थानी पीएम मोदी यांची भेट घेऊन मेस्सीचा भारत दौरा संपणार आहे.

एक्सप्रेस स्पोर्ट्सच्या दोन आठवड्यांपूर्वीच्या रिपोर्टनुसार, मेस्सी भारत दौऱ्यात काही दिग्गजांसोबत सेव्हन-ए-साइड क्रिकेट सामना खेळताना दिसू शकतो. वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा आणि एमएस धोनी यांसारखे मोठे खेळाडू मेस्सीसोबत फ्रेंडली मॅचचा भाग बनू शकतात, असे या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. मेस्सीचा मुंबई दौरा 14 डिसेंबर 2025 रोजी होणार असून त्यामुळे चाहत्यांना एका शानदार सामन्याची आशा आहे. येत्या काळात या संदर्भात अधिकृत घोषणा होऊ शकते.

लिओनेल मेस्सी (Lionel Messi) हा अर्जेंटिनाचा दिग्गज खेळाडू असून संपूर्ण जगभर त्याचे लाखो चाहते आहेत. भारतातही त्याच्या खेळावर प्रेम करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मेस्सी शेवटचा 2011 साली भारतात आला होता. तेव्हा त्याने कोलकात्याच्या साल्ट लेक स्टेडियमवर व्हेनेझुएलाविरुद्ध एक FIFA फ्रेंडली सामना खेळला होता. आता तब्बल 14 वर्षांनंतर भारतीय चाहते पुन्हा एकदा मेस्सीची झलक पाहू शकणार आहेत.

Comments are closed.