मेटासाठी ‘AI’ टूल बनवणाऱ्या तिचीच नोकरी गेली? मेटा कंपनीतील नोकरकपातीबाबत एका व्यक्तीचा दावा व्हायरल

गेल्या अनेक महिन्यांपासून मेटा (Meta) कंपनीतील कर्मचाऱ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर (AI) मध्ये अधिक काम करण्यासाठी प्रवृत्त केले जात असल्याचे वृत्त होते. वेगवेगळ्या टीम्समध्ये फेरबदल केले जात होते. मॅनेजर्स हे कामाचा वेग, कमी कर्मचाऱ्यांची रचना आणि फक्त एआयवर लक्ष केंद्रित करणाऱ्या लहान ग्रुप्सबद्दल बोलत होते. कंपनीच्या आत एक गोष्ट स्पष्ट दिसत होती; AI च्या या नव्या युगाशी जुळवून घ्या, नाहीतर मागे पडण्याची भीती बाळगा. आणि त्यानंतर नोकरकपातीची (ले-ऑफ) वेळ आली.

आता, ‘X’ (ट्विटर) वरील एका व्हायरल पोस्टमुळे या संपूर्ण चर्चेला एक नवे वळण मिळाले आहे.

ज्युलीयन नावाच्या एका युझरने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये असा दावा केला आहे की, मेटा कंपनीत कर्मचाऱ्यांची कपात सुरू होण्यापूर्वी, त्यांना कंपनीत वापरासाठी एआय टूल्स बनवण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले होते. या पोस्टला आधीच जवळजवळ १० लाख व्ह्यूज मिळाले असून सोशल मीडियावर यावर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे, विशेषतः अशा वेळी जेव्हा मेटा कंपनी एआय वेगाने प्रगती पुढे जात आहे.

अर्थात या पोस्टमध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची कोणत्याही यंत्रणेकडून शहानिशा करण्यात आलेली नाही. मेटाकडूनही अद्याप यावर काही माहिती देण्यात आलेली नाही. तरी या सर्व घडामोडींची वेळ लोकांचे लक्ष वेधून घेणारी ठरली आहे.

मेटा कंपनीने नुकतीच सिंगापूर, युरोप आणि अमेरिकेसह अनेक देशांमधील कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यास सुरुवात केली आहे. २० मे रोजी हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्याचे ईमेल्स येण्यास सुरुवात झाली, ज्यामध्ये काही कर्मचाऱ्यांना तर पहाटे ४ वाजताच (स्थानिक वेळेनुसार) याच्या नोटिसा मिळाल्या.

ज्युलीयनच्या मते, मेटा कंपनीने काही महिन्यांपूर्वी संपूर्ण कंपनीसाठी ‘एआय वीक’ (AI Week) आयोजित केला होता. त्या काळात रोजचे नियमित काम कथितपणे थांबवून कर्मचाऱ्यांना एआय टूल्स आणि त्यांच्या कार्यपद्धती समजून घेण्यास सांगण्यात आले होते.

ज्युलियन मेटा ले ऑफ पोस्ट

असा दावा केला जात आहे की, हा उपक्रम संपता संपता कर्मचाऱ्यांकडून कंपनीच्या अंतर्गत वापरासाठीच्या एआय प्रॉडक्ट्सच्या अर्ली व्हर्जन्स तयार करून घेण्याची अपेक्षा होती, ज्यांचा नंतर कंपनीमध्ये आणखी विकास केला जाऊ शकेल.

‘ज्या प्रोजेक्ट्सना मंजुरी मिळाली, त्यांची एआय आणि इंजिअर्सच्या मदतीने पुढील डेव्हलप्मेंटसाठी निवड करण्यात आली’, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. ज्युलीयनने दावा केला आहे की, त्याच्या पत्नीने तिच्या वरिष्ठांसह आणि इंजिअर्सच्या सोबतीने अशाच एका एआय प्रॉडक्टला अधिक चांगले बनवण्यासाठी मेहनत घेतलीआणि हे करत असतानाच, आपण जे टूल बनवण्यास मदत करत आहोत तेच एक दिवस आपली जागा घेईल, अशी सुप्त भीतीही तिच्या मनात होती आणि आजची परिस्थिती बघा, तिला कामावरून काढून टाकण्यात आले आहे’, असे या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे.

एआयमुळे नोकरी जाण्याची ही भीती आता फक्त एकाच प्रकारची कामे करणाऱ्या नोकऱ्यांपुरती मर्यादित राहिलेली नाही. ती हळूहळू कॉर्पोरेट कार्यालये, टेक कॅम्पस, मिटिंग रूम्स आणि इंजिनिअरिंग टीम्समध्येही शिरकाव करत आहे. जे लोक स्वतः एआय बनवत आहेत, त्यांनाच आता प्रश्न पडू लागला आहे की ते स्वतःची जागा घेणाऱ्यांनाच तर प्रशिक्षण देत नाहीयेत ना.

संपूर्ण सोशल मीडियावर युझर्सनी यावर संताप, चिंता अशा संमिश्र भावना व्यक्त केल्या आहेत. काहींनी या परिस्थितीला अत्यंत भयानक म्हटले आहे, तर काहींच्या मते हे कधी ना कधी घडणारच होते.

मेटा कंपनीत अशाच प्रकारे घटना घडल्या आहेत, याला दुजोरा देणारा कोणताही सार्वजनिक पुरावा उपलब्ध नाही. परंतु, या विषयावर होणारी चर्चा टेक इंडस्ट्रीमध्ये (तंत्रज्ञान क्षेत्रात) वाढणारी अस्वस्थता दर्शवते.

अहवालांनुसार, मेटा कंपनी आपले पूर्ण लक्ष आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर केंद्रित करत असल्याने, जवळपास ७,००० कर्मचाऱ्यांना आधीच एआय-केंद्रित टीम्स आणि एआय एजंट प्रोजेक्ट्समध्ये बदलण्यात आले आहे.

मार्क झुकरबर्गसाठी आता एआय ही कंपनीची सर्वात महत्त्वाची प्राथमिकता असल्याचे दिसते आहे असे बोलले जात आहे. गुगल आणि ओपनएआय सोबतची स्पर्धा वाढत चालली असताना, मेटा कंपनी यावर्षी एआय इन्फ्रास्ट्रक्चर आणि संबंधित तंत्रज्ञानावर १०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त खर्च करू शकते, असे रिपोर्ट सांगत आहेत. त्याच वेळी, कंपनी अंतर्गत स्तरावर कर्मचाऱ्यांची चिंता कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.

कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या एका नोटमध्ये झुकरबर्गने कथितपणे म्हटले आहे की, यावर्षी आणखी मोठ्या प्रमाणावर नोकरकपात होण्याची शक्यता नाही. तरीही विशिष्ट विभागांमध्ये गरजेनुसार कपात करण्याची शक्यता त्यांनी खुली ठेवली आहे. त्यांनी असेही सांगितले की, मेटाचे कर्मचारी आता कमी व्यवस्थापन आणि नोकरशाही असलेल्या लहान एआय-नेटिव्ह ‘पॉड्स’ (ग्रुप्स) मध्ये काम करत आहेत.

Comments are closed.