मेटाला ३७५ मिलियन डॉलर्सचा दंड; न्यू मेक्सिकोमध्ये फेसबुक, इंस्टाग्राम सेवा बंद करण्याची कंपनीची धमकी
सोशल मीडिया क्षेत्रातील दिग्गज कंपनी मेटा (Meta) आणि अमेरिकेतील न्यू मेक्सिको राज्य यांच्यातील कायदेशीर वाद टोकाला पोहोचला आहे. मुलांच्या सुरक्षेशी संबंधित एका प्रकरणात ज्युरीने मेटाला दोषी ठरवून ३७५ मिलियन डॉलर्सचा (सुमारे ३,१०० कोटी रुपये) दंड ठोठावला आहे. या कारवाईनंतर मेटाने न्यू मेक्सिकोमध्ये फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲप यांसारख्या सेवा पूर्णपणे बंद करण्याची धमकी दिली आहे.
नेमके काय आहे प्रकरण?
मेटा कंपनीने आपल्या प्लॅटफॉर्मवर मुलांच्या सुरक्षेबाबत युजर्सची दिशाभूल केली आणि बाल शोषणासारख्या गंभीर घटना रोखण्यात अपयशी ठरली, असा आरोप न्यू मेक्सिको राज्याने केला होता. या प्रकरणात ज्युरीने मेटाला जबाबदार धरले आहे. आता या प्रकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात (Remedies Phase) कंपनीला आपल्या प्लॅटफॉर्मवर कोणते तांत्रिक बदल करावे लागतील, यावर सुनावणी होणार आहे.
मेटाने न्यायालयाच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कंपनीने म्हटले आहे की, “सुचवण्यात आलेले बदल व्यावहारिक नाहीत. जर न्यू मेक्सिकोसाठी वेगळे नियम लागू केले, तर कंपनीला त्या राज्यासाठी आपल्या ॲप्सची स्वतंत्र आवृत्ती तयार करावी लागेल. जे तांत्रिकदृष्ट्या अत्यंत गुंतागुंतीचे आणि खर्चिक असेल. जर हे जाचक नियम लादले गेले, तर न्यू मेक्सिकोमधून सेवा काढून घेण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय उरणार नाही,” असा इशारा कंपनीने दिला आहे.
दुसरीकडे न्यू मेक्सिकोचे ॲटर्नी जनरल राऊल टोरेज यांनी मेटाची ही धमकी म्हणजे एक पीआर स्टंट असल्याचे म्हटले आहे. त्यांनी मागणी केली आहे की, मेटाने वयाची कडक तपासणी, हानिकारक मजकुरावर बंदी आणि मुलांच्या शोषणाला आळा घालण्यासाठी स्वतंत्र देखरेख यंत्रणा राबवावी. मेटाकडे हे बदल करण्याची क्षमता आहे, परंतु कंपनी सुरक्षेऐवजी नफ्याला प्राधान्य देत आहे, असा आरोपही त्यांनी केला.
Comments are closed.