पुण्यात लहरी पावसाचा दंगा, आज मुंबईत मेघ गर्जनेसह बरसणार!
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागांत सोमवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड तसेच विदर्भातील वाशीम जिह्यात लहरी पावसाने ‘दंगा’ घातला आणि नागरिकांची प्रचंड तारांबळ उडवली. दुपारच्या तीव्र उन्हाचा सामना करणाऱ्या नागरिकांना पावसामुळे हवेत गारवा निर्माण होऊन दिलासा मिळाला. मंगळवारी मुंबई शहर आणि उपनगरांत मेघगर्जनेसह पावसाची हजेरी लागणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.
मार्चचे सुरुवातीचे दोन आठवडे नागरिकांनी प्रचंड उष्मा सहन केला. महिनाभरात चार वेळा उष्णतेची लाट धडकली. त्यानंतर आता अवकाळी पावसाच्या हजेरीने हवेत गारवा निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. पुण्यातील औंध, बाणेर, बालेवाडी, म्हाळुंगे या भागांना पावसाने झोडपले. तसेच पिंपरी-चिंचवड, वाशिम, नाशिक भागातही जोरदार पाऊस पडला. त्यापाठोपाठ मंगळवारी मुंबई शहर आणि उपनगरांत मेघगर्जनेसह पावसाची बरसात होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यानुसार हवामान खात्याने अलर्ट दिला आहे. राज्यातील एकूण 12 जिह्यांत अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मंगळवारपासून मुंबईच्या शहर आणि उपनगरांमध्ये हलका आणि तुरळक तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची चिन्हे आहेत. त्यादृष्टीने अनुकूल वातावरण निर्माण झाल्याची हवामान खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. मुंबईत 2 एप्रिलपर्यंत कमाल तापमान सरासरी 31 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
वातावरणात मोठा बदल
हवामान शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, अरबी समुद्रातून येणारा आर्द्रतेचा प्रवाह तसेच परस्परसंबंधित हवामान प्रणाली यांच्या एकत्रित परिणामामुळे वातावरणात मोठा बदल होत आहे. हा बदल उन्हाळ्यापूर्वीच्या कोरडय़ा हवामानाच्या शिखराकडून अधिक अस्थिर मान्सूनपूर्व टप्प्याकडे होणारे संक्रमण दर्शवतात. एप्रिलच्या सुरुवातीला येणारा मान्सूनपूर्व पाऊस तीव्र उष्णतेनंतर दिलासा असला तरी वादळी वारे आणि सोसाटय़ाच्या वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.
'यलो अलर्ट'
ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, पुणे घाट, कोल्हापूर, नांदेड, सातारा घाट, लातूर, धाराशीव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिह्यांना पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिला आहे.
'ऑरेंज' अलर्ट
जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली या जिह्यांत हवामान खात्याकडून पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.
Comments are closed.