१०२ कोटी रुपयांच्या मेथॅम्फेटामाइनला जप्त केले

वृत्तसंस्था/गुवाहाटी

आसाम रायफल्सने मिझोरमच्या चंफाई जिह्यात अंदाजे 34,218 किलो मेथाम्फेटामाइन जप्त केले आहे. गोळ्यांच्या स्वरुपात सापडलेल्या या मुद्देमालाची अंदाजित किंमत 102.65 कोटी रुपये आहे. चंफाईमधील झोटे गावाजवळ गुप्त माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान संशयिताने अवैध वस्तू घटनास्थळी सोडून जंगलात पळ काढला. आसामामधील कछार जिह्यात करण्यात आलेल्या अन्य एका कारवाईमध्ये 12 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी एका तस्कराला अटक केली आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्विटरवर पोस्ट करत या कारवाईची माहिती दिली. जिह्यातील कथलबस्ती भागात पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत 40,000 याबा गोळ्या जप्त करत एका तस्कराला अटक केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी, 16 सप्टेंबर रोजी झोखावथरमध्ये 20.10 कोटी रुपयांचे 2,462 किलो हेरॉइन जप्त करण्यात आले होते. तर, 13 आणि 12 सप्टेंबर रोजी 14.22 कोटी रुपयांच्या मेथाम्फेटामाइन गोळ्या जप्त करण्यात आल्या होत्या.

Comments are closed.