स्थानकांची कामे अपूर्ण तरी भाईंदर मेट्रोच्या लोकार्पणाचा घाट; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या उद्घाटन
मीरा-भाईंदरमधील काशिगाव ते दहिसर या मेट्रो मार्गिका-9 चे लोकार्पण 7 एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होत आहे. मात्र काशिगाव, मिरागाव स्टेशनवर पार्किंगची बोंब असून जिन्यांची कामेदेखील रखडली आहेत. असे असताना एमएमआरडीएने उद्घाटनाचा घाट घातल्याने आश्चर्य व्यक्त होत असून प्रवाशांच्या सुरक्षेचे काय, असा सवाल केला जात आहे.
वाहतूककोंडीतून भाईंदरकरांची सुटका करण्यासाठी दहिसर ते काशिगाव मेट्रोची 2019 मध्ये घोषणा करण्यात आली होती. साधारण पाच ते सहा किमी असलेल्या या मेट्रो लाईनबर दहिसर, काशिगाव, पांडुरंगवाडी व मिरागाव ही स्थानके आहेत. परंतु मिरागाव तसेच काशिगाव स्थानकांची कामे अपूर्ण असून या दोन्ही ठिकाणी पार्किंग, जिन्यांची कामे अद्यापपर्यंत अपूर्ण आहेत. असे असताना एमएमआरडीएने भाईंदरच्या मेट्रोचे लोकार्पण करण्यासाठी घाईगडबड केली आहे.
आधी अपूर्ण कामांवर आवाज उठवा…
मेट्रोच्या उद्घाटनाची तारीख जाहीर होताच भाईंदरमध्ये आमदार नरेंद्र मेहता आणि परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी शहरात फलकबाजी सुरू केली आहे. मात्र श्रेयवादासाठी बॅनरबाजी करण्याऐवजी मेट्रोच्या अपूर्ण कामांवर आवाज उठवा, असा संताप व्यक्त होत आहे. रिक्षांसाठी किंवा इतर वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होण्याची शक्यता आहे.
मेट्रोचे जिने व स्टेशनची कामे अर्धवट स्थितीत असतानाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण होणार आहे. सरकारने आधी प्रवाशांच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावे नंतर उद्घाटनाचा घाट घालावा, असे शहरप्रमुख प्रशांत सावंत यांनी सांगितले.
काशिगाव स्थानकाजवळ उतरणारा जिना आमदार नरेंद्र मेहता यांच्या कंपनीच्या मालकीच्या जागेत आहे. मात्र ही जागा अजूनही हस्तांतरित केलेली नाही. त्यामुळे या जिन्याचे काम अजूनही अपूर्ण आहे. त्यामुळे आधी मेहता यांनी ही जागा हस्तांतरित करावी मग बॅनरबाजी करून मेट्रोचे श्रेय घ्यावे, असे गटनेता काँग्रेस जय ठाकूर म्हणाले.
Comments are closed.