मेक्सिकोनेही भारतावर ५० टक्के कर लावला आहे
चीन आणि अन्य आशियायी देशांवरही करात वाढ
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
अमेरिकेपाठोपाठ मेक्सिको या देशानेही भारतावर तसेच अन्य आशियायी देशांवर 50 टक्के आयातशुल्क लागू केले आहे. मेक्सिको सरकारचा हा प्रस्ताव त्या देशाच्या संसदेच्या दोन्ही सभागृहांनी गुरुवारी संमत केला. वाहने, वाहनांचे सुटे भाग, वस्त्रप्रावरणे, प्लॅस्टिक्स, पोलाद, ग्राहकोपयोगी वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स आदी 1,400 हून अधिक वस्तूंच्या आयातीवर ही करवाढ करण्यात आली आहे. भारतासह अनेक देशांचा मेक्सिकोशी मुक्त व्यापार करार नाही. त्यामुळे या सर्व देशांकडून या देशाला होणाऱ्या निर्यातीवर या वाढीव व्यापार शुल्काचा परिणाम होण्याची शक्यता आहे. मेक्सिकोने भारतासह चीन, जपान, दक्षिण कोरिया आणि आशिया खंडातील इतर देशांवर आयात कर 50 टक्के केल्याची घोषणा केली.
समतोल साधण्यासाठी…
देशांतर्गत उत्पादन वाढविण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि अन्य देशांशी असणारी व्यापारी तूट कमी करुन व्यापारी समतोल निर्माण करणे, हे या करवाढीचे उद्दिष्ट्या आहे. अनेक आशियायी देशांसमवेत, विशेषत: चीन समवेत मेक्सिकोची व्यापारी तूट प्रचंड प्रमाणात वाढली आहे. इतर देशांमधून होणाऱ्या स्वस्त उत्पादनांची आयात रोखण्यासाठी, तसेच स्थानिक पुरवठा साखळ्या भक्कम करण्यासाठी हा निर्णय घेतला गेला, असे या देशाच्या अध्यक्षा क्लौडिया शेइनबौम यांनी गुरुवारी संसदेत प्रस्ताव संमत झाल्यानंतर पत्रकारांशी वार्तालाप करताना प्रतिपादन केले.
चीनचा जोरदार विरोध
व्यापारी शुल्क वाढवून 50 टक्के करण्याच्या मेक्सिकोच्या निर्णयाला चीनकडून प्रचंड विरोध करण्यात आला होता. चीनकडून होणाऱ्या निर्यातीवर अवलंबून असणाऱ्या व्यापारी आणि उत्पादक वर्गानेही या निर्णयाला मोठा विरोध प्रारंभीच्या काळात केला होता. त्यामुळे गेल्या सप्टेंबरमध्ये मांडण्यात आलेल्या या प्रस्तावाला लवकर मान्यता मिळू शकली नाही. अखेरीस संसदेत हा प्रस्ताव संमत झाला.
अमेरिकेचा दबाव ?
मेक्सिकोने आपले आयातशुल्क वाढवावे, असा दबाव अमेरिकेने आणला आहे, असे काही राजकीय तज्ञांचे मत आहे. अमेरिकेने बहुतेक देशांवर व्यापारी शुल्क मोठ्या प्रमाणात वाढविले आहे. त्यामुळे अनेक देश मेक्सिकोच्या मार्गे अमेरिकेत निर्यात करण्याचा प्रयत्न करु शकतात. कारण मेक्सिकोच्या वस्तूंवर अमेरिकेने मोठा कर लावलेला नाही. त्यामुळे मेक्सिको देशाचा उपयोग ‘बायपास’ प्रमाणे केला जाऊ शकतो, अशी अमेरिकेला शंका आहे, असेही प्रतिपादन केले गेले आहे.
चीनकडून संतप्त प्रतिक्रिया
मेक्सिकोच्या या निर्णयावर चीनने हल्लाबोल केला आहे. चीनी मालावर मेक्सिको एवढ्या प्रमाणात कर लावणार असेल, त्या त्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध बिघडणार आहेत. या देशाने ही गंभीर चूक केली असून ती वेळेवर दूर करावी, असा इशारा चीनने दिला आहे. चीनने मेक्सिकोच्या व्यापार धोरणाची चौकशी करण्यासही प्रारंभ केला आहे. मेक्सिको देश अमेरिकेच्या दक्षिणेला आहे.
Comments are closed.