नऊ लाखांच्या उत्पन्नासाठी 2 कोटी नऊ लाखांचे घर; म्हाडाकडून अल्प उत्पन्न गटाची क्रूर थट्टा…
मोठा गाजावाजा करत म्हाडाने मुंबईतील 2640 घरांसाठी लॉटरी जाहीर केली; परंतु या लॉटरीमधील घरांच्या किमती पाहून सर्वसामान्यांचे डोळे पांढरे झाले आहेत. नऊ लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या अल्प उत्पन्न गटासाठी वरळीतील प्रेरणा सोसायटीत असलेल्या म्हाडाच्या फ्लॅटची किंमत चक्क 2 कोटी नऊ लाख रुपये आहे. एवढेच नव्हे तर, अल्प उत्पन्न गटासाठी लॉटरीमध्ये उपलब्ध असलेल्या सव्वाशेहून अधिक घरांच्या किमती एक कोटीच्या घरात आहेत. त्यामुळे म्हाडाकडून अल्प उत्पन्न गटाची थट्टा सुरू आहे का, सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देणे या मूळ उद्देशाचा म्हाडाला विसर पडलाय का, असा संतप्त सवाल अर्जदारांनी उपस्थित केला आहे.
म्हाडाच्या मुंबई मंडळाने दादर, वांद्रे, गिरगाव, गोरेगाव, विक्रोळी येथील घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. यात बांधकाम सुरू असलेली 1762 घरे, विकास नियंत्रण नियमावली 33 (5) अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून म्हाडाला मिळालेली 371 घरे, 33 (7) अंतर्गत म्हाडाला मिळालेली 188 घरे तसेच मुंबई मंडळाच्या मागील सोडतीमधील शिल्लक 319 घरांचा समावेश आहे. लॉटरीमध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी केवळ 145 घरे उपलब्ध आहेत. अल्प उत्पन्न गटासाठी 858 घरे असली तरी त्याच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. याशिवाय मध्यम उत्पन्न गटासाठी 1408, तर उच्च उत्पन्न गटासाठी 229 घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
चार तासांत 430 अर्ज
म्हाडाने आज दुपारी 3 वाजल्यापासून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यानंतर म्हाडाच्या घरासाठी अर्जदारांकडून मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे. पहिल्या चार तासांत म्हणजेच सायंकाळी 7 वाजेपर्यंत तब्बल 430 जणांनी अर्ज केला होता, तर 165 जणांनी अनामत रक्कमदेखील भरली आहे. यापूर्वी 2024 मध्ये म्हाडाने मुंबईतील 2030 घरांसाठी काढलेल्या लॉटरीसाठी तब्बल 1 लाख 13 हजार अर्ज आले होते.
29 लाख ते 7 कोटींपर्यंतची घरे
या लॉटरीतील सर्वात कमी किमतीचे घर पीएमजीपी मानखुर्द येथे आहे. 20.91 चौरस मीटरच्या या घराची किमत 29 लाख 37 हजार रुपये आहे. सर्वात महागडे घर ताडदेवच्या क्रिसेंट टॉवरमध्ये आहे. 142.3 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या या घराची किंमत 6 कोटी 82 लाख रुपये आहे. पहाडी गोरेगाव येथे पंतप्रधान आवास योजनेतील घर 32 लाख रुपयांना असल्यामुळे येथील 13 घरांसाठी हजारोंच्या संख्येने अर्ज येण्याची शक्यता आहे.
Comments are closed.