म्हाडाची घरे आता ‘बुक माय होम’द्वारे मिळणार, विक्रीविना पडलेली घरे विकण्यासाठी शक्कल

म्हाडाच्या कोकण मंडळाची प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत विविध गृहनिर्माण योजनांमधील 13,395 घरे विक्रीविना पडून आहेत. या घरांच्या विक्रीसाठी म्हाडाने https://bookmyhome.mhada.gov.in/ या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. याद्वारे विक्रीसाठी उपलब्ध असलेली घरे अर्जदार या संकेतस्थळावर पाहू शकतील तसेच त्यांच्या आवडीनुसार घराची खरेदी करू शकणार आहेत. अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधत बुधवारी या संकेतस्थळाचा शुभारंभ करण्यात आला.

‘बुक माय होम’ या संकेतस्थळावर कोकण मंडळाच्या विरार बोळींज, खोणी, शिरढोण, गोठेघर, भंडार्ली येथील गृहनिर्माण प्रकल्पांतील विक्री न झालेल्या सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रथम प्राधान्य योजनेतील घरांच्या सोडतीतील समाविष्ट अर्जदारांना उपलब्ध घरांपैकी कुठले घर मिळेल याबाबत निश्चिती नव्हती. मात्र ‘बुक माय होम’मुळे अर्जदारास आपल्या पसंतीचे घर निवडण्याची मुभा मिळणार आहे, अशी माहिती कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिली.

या नवीन प्रणालीनुसार अर्ज नोंदणीकरणा वेळी आधार कार्ड, पॅन कार्डची छायांकित प्रत, स्वयंघोषणापत्र आदी बाबी ऑनलाईन संकेतस्थळावर अपलोड करावयाच्या आहेत. त्यानंतर या कागदपत्रांची ऑनलाईन पडताळणी होणार आहे. अर्जदाराचा प्रोफाईल तयार झाल्यानंतर अर्जदारास मंडळनिहाय उपलब्ध सदनिकांची माहिती फ्लॅट नंबरसह मिळणार आहे, असेही त्या म्हणाल्या.

पात्रतेच्या अटी Lax

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत असलेल्या घरांव्यतिरिक्त इतर घरांच्या पात्रतेच्या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. तसेच उत्पन्न गटाचे कुठलेही निकष ठेवण्यात आलेले नाहीत. या घरांमध्ये सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या संवर्गांसाठी सदनिका आरक्षण ठेवण्यात आले आहे.

Comments are closed.