म्हाडाला हवीय 350 हेक्टर जमीन! ठाणे, पनवेल, पालघरमधील जागेची केली मागणी, घरांच्या उभारणीसाठी जागाच शिल्लक नाही

मुंबईतील घरांच्या किमती गगनाला भिडल्यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) घरांकडे नागरिकांचा कल आहे. मात्र, सर्वसामान्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या म्हाडाच्या कोकण मंडळाकडे नवीन गृहप्रकल्प उभारण्यासाठी सध्या जमिनीच शिल्लक नाही. त्यामुळे गृहप्रकल्प उभारणीसाठी 350 हेक्टर सरकारी जमीन मिळावी, अशी मागणी कोकण मंडळाने राज्य सरकारकडे केली आहे.
कोकण मंडळाने ठाणे, वसई, नवी मुंबईतील 5285 घरांसाठी लॉटरी काढली. त्यासाठी दीड लाखाहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. यावरून मुंबईच्या आसपासच्या परिसरातील घरांनाही नागरिकांची मोठी मागणी असल्याचे दिसतेय. येत्या काळात कोकण मंडळाला सर्वसामान्यांसाठी मोठय़ा प्रमाणात परवडणाऱ्या घरांची निर्मिती करायची आहे; परंतु इतका मोठा गृहप्रकल्प उभारण्यासाठी आमच्याकडे मोकळा भूखंड उपलब्ध नाही. त्यामुळे ठाणे, पनवेल, अंबरनाथ, भिवंडी, वसई, पालघर जिह्यातील सुमारे 350 हेक्टर सरकारी जमिनी मिळाव्यात अशी मागणी आम्ही राज्य सरकारकडे केली आहे, असे म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
ठाणे-बोरिवली टनेलसाठी राज्य सरकारच्या सांगण्यावरून म्हाडाने एमएमआरडीएला 6 हजार चौरस मीटर भूखंड दिला आहे. त्यामुळे या ठिकाणी म्हाडाला 1173 घरांऐवजी केवळ 1050 घरे मिळाली असून तब्बल 123 घरांचे नुकसान सोसावे लागले. या भूखंडाच्या बदल्यात आसपास दुसरा भूखंड मिळावा यासाठीदेखील कोकण मंडळाचे प्रयत्न सुरू आहेत.
Comments are closed.