मास्टर लिस्टमधील विजेत्यांची घराकडे पाठ, दोन वर्षांनंतरही ताबा न घेणाऱ्यांना म्हाडाची नोटीस

म्हाडाच्या मुंबई ईमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाने मास्टर लिस्टमधील 265 घरांसाठी डिसेंबर 2023 मध्ये लॉटरी काढली होती, मात्र दोन वर्षे होत आली तरी अजूनही 70 विजेत्यांनी घराचा ताबा घेतलेला नाही. त्यामुळे ‘तुमच्या घराचा ताबा रद्द का करू नये,’ अशी नोटीस म्हाडाने या विजेत्यांना धाडली आहे.

अरुंद भूखंड किंवा आरक्षणांमुळे भूखंड बाधित झाले असल्यास जुन्या इमारतींच्या ठिकाणी पुनर्रचित इमारत बांधणे शक्य होत नाही. अशा बाधित इमारतींच्या रहिवाशांना मास्टर लिस्टमध्ये समाविष्ट करून इतरत्र पुनर्रचित इमारतींमधील अतिरिक्त गाळय़ांचे वाटप मालकी तत्त्वावर केले जाते.  म्हाडाने 2023 मध्ये पहिल्यांदाच 265 रहिवाशांना घरे देण्यासाठी संगणकीय सोडत काढली. स्वीकृती पत्र सादर केल्यानंतर 45 दिवसांत ताबा घेणे बंधनकारक आहे. अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता सदनिकेचे वितरण रद्द होईल, असे म्हाडाने म्हटले होते. त्यानुसार म्हाडाने आलेल्या स्वीकृती पत्राच्या आधारे 172 जणांना देकार पत्र दिले आहे. त्यातील केवळ 93 जणांनी घराचा ताबा घेतला असून नऊ जणांची ताबा प्रक्रिया सुरू आहे. 70 जणांनी घराचा ताबा घेतलेला नाही. त्यामुळे म्हाडाने त्यांना नोटीस बजावली.

Comments are closed.