संक्रमण शिबिरातील तीन हजार रहिवाशांचे पुन्हा सर्वेक्षण होणार, म्हाडा फेस रीडिंग तंत्रज्ञानाचा वापर करणार

संक्रमण शिबिरातील घुसखोरीला चाप लावण्यासाठी म्हाडातर्फे सुरू असलेले रहिवाशांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण आता अंतिम टप्प्यात आहे, मात्र  तीन हजार रहिवाशांचे पुन्हा एकदा सर्वेक्षण करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. या रहिवाशांचे हाताचे ठसे बायोमेट्रिक मशीनमध्ये व्यवस्थित उमटत नसल्यामुळे या रहिवाशांची ओळख पटविण्यासाठी म्हाडा आता फेस रीडिंग तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. त्यासाठी सॉफ्टवेअर डेव्हलप करण्याचे काम सध्या सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीत मुंबई शहर व उपनगरात एकूण 34 ठिकाणी संक्रमण शिबिरे असून यात 20 हजार रहिवासी राहतात. शासन निर्णयानुसार संक्रमण शिबिरातील रहिवाशांचे ‘अ’, ‘ब’ व ‘क’ प्रमाणे वर्गीकरण होणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने म्हाडामार्फत फेब्रुवारीपासून रहिवाशांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण सुरू आहे. आतापर्यंत 17 हजारांहून अधिक रहिवाशांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे, मात्र जवळपास तीन हजार रहिवाशांच्या हाताचे ठसे व्यवस्थित न उमटल्यामुळे या रहिवाशांचे पुन्हा एकदा सर्वेक्षण करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. या महिनाअखेरपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याचा म्हाडाचा मानस आहे.

दीड हजार रहिवाशांच्या घराला कुलूप

बायोमेट्रिक सर्वेक्षणाला प्रतिसाद न देणाऱ्या रहिवाशांना घुसखोर ठरवणार असा इशारा म्हाडाने दिला तरी अजूनही काही रहिवासी सर्वेक्षणाला प्रतिसाद देत नसल्याचे निदर्शनास आले आहे. सर्वेक्षणाची टीम दाखल होताच घराला कुलूप लावून गायब होणाऱ्या रहिवाशांचा आकडा जवळपास दीड हजाराच्या घरात आहे, अशी माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे या रहिवाशांचे सर्वेक्षण कसे पूर्ण करायचे असा म्हाडापुढे प्रश्न आहे.

असे होणार वर्गीकरण

‘अ’ प्रवर्गात मूळ रहिवासी ज्यांना संक्रमण शिबिरामध्ये स्थानांतरण करण्यात आलेले आहे. ‘ब’ प्रवर्गात असे रहिवासी ज्यांनी मुखत्यारपत्र किंवा तत्सम प्राधिकार पत्राद्वारे मूळ रहिवाशांकडून संक्रमण शिबिरातील गाळय़ांचा हक्क घेतला आहे तसेच ‘क’ म्हणजे घुसखोर. ज्यांनी म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील गाळय़ांचा बेकायदेशीपणे ताबा घेतला आहे.

Comments are closed.