‘म्हाडा’त हेलपाटे मारणाऱ्या सर्वसामान्यांची पायपीट थांबणार, सर्वाधिक गर्दीच्या विभागात ऑनलाइन सुविधा देणार

>> मंगेश दराडे

म्हाडा मुख्यालयात येणाऱ्या रहिवाशांची प्राधिकरण आता सविस्तर माहिती गोळा करणार आहे. त्यामुळे मुख्यालयातील कोणत्या विभागात कामानिमित्त दिवसाला किती रहिवासी येतात याची माहिती म्हाडाला उपलब्ध होणार आहे. जेणेकरून भविष्यात त्या विभागातील सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा म्हाडाचा प्रयत्न असणार आहे.

म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवन या इमारतीत मुंबई मंडळ, कोकण मंडळ, मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळ आणि झोपडपट्टी सुधार मंडळ अशी विविध कार्यालये आहेत. दिवसाला विविध कामानिमित्त चार ते पाच हजार रहिवासी म्हाडा मुख्यालयाला भेट देतात. एकाच कामासाठी रहिवाशांना वारंवार चकरा माराव्या लागतात. त्यामुळे कार्यालयावर ताण येतोच, शिवाय हे रहिवासी मुख्यालयात येताना बस, रेल्वे, मेट्रो अशा सार्वजनिक सुविधांचा वापर करत असल्याने या सुविधांवरदेखील ताण येतो. रहिवाशांनी पायपीट कमी व्हावी आणि त्यांना घरबसल्या ऑनलाइन सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी म्हाडाने आता व्हिजिटर प्रोफायलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

सुरक्षा रक्षकांना टॅब देणार

मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरच रहिवाशांकडून त्यांना कोणत्या विभागात आणि कोणत्या अधिकाऱ्याला भेटायचे आहे, अशी माहिती घेतली जाणार आहे. त्यासाठी सुरक्षा रक्षकांना टॅब देण्यात येणार आहे. तीन ते चार महिने ही माहिती गोळा केली जाणार आहे. त्यामुळे कोणत्या विभागात कामासाठी रहिवाशांची सर्वाधिक गर्दी होते याची माहिती प्राधिकरणाला मिळणार आहे. ही गर्दी कमी करण्यासाठी त्या विभागातील सेवा ऑनलाइन  उपलब्ध करून देता येतील का, त्यादृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत, अशी महिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Comments are closed.