एमएचटी-सीईटी पीसीएम गटाची 5 मे रोजी फेरपरीक्षा, गणिताच्या पेपरात 21 प्रश्न चुकल्याची सीईटी सेलची कबुली

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) 27 एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या ‘पीसीएम गट’ सकाळच्या सत्रामध्ये गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेत 21 प्रश्न चुकल्याची कबुली सीईटी सेलकडून देण्यात आली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना 5 मे रोजी फेरपरीक्षा द्यावी लागणार आहे.
यासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे अनेक विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीची दखल घेऊन या विद्यार्थ्यांना न्याय देण्याचे निर्देश पाटील यांनी दिले होते. या वर्षी एमएचटी-सीईटी पीसीएम गटाची परीक्षा 19 एप्रिल ते 27 एप्रिल 2025 दरम्यान 15 सत्रांमध्ये 197 परीक्षा केंद्रांवर पार पडली.
27 एप्रिलच्या सकाळी 27837 उमेदवारांनी परीक्षा दिलेली होती. परीक्षेनंतर काही उमेदवार आणि पालकांनी इंग्रजी माध्यमातील गणित प्रश्नपत्रिकेत तांत्रिक त्रुटी असल्याबाबत तक्रारी केल्या. राज्य सीईटी कक्षाने तज्ञांमार्फत प्रश्नपत्रिकेची पडताळणी केली असता 21 प्रश्नांमध्ये तांत्रिक त्रुटी असल्याचे आढळले. उमेदवारांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून सदर 27837 उमेदवारांची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित उमेदवारांनी अधिकृत www.mahacet.org या वेबसाईटवर भेट देऊन अद्ययावत माहितीची नोंद घ्यावी, असे आवाहन सीईटी कक्षाकडून करण्यात आले आहे.
Comments are closed.