मायक्रोसॉफ्ट मोठी गुंतवणूक करणार आहे

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

संगणक सॉफ्टवेअर क्षेत्रातील जगातील सर्वात मोठी असणारी मायक्रोसॉफ्ट ही कंपनी भारतात 17.5 अब्ज डॉलर्स (साधारणत: 1 लाख 60 हजार कोटी रुपये) इतकी गुंतवणूक करणार आहे. भारतात कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाचा विकास व्हावा, यासाठी ही गुंतवणूक केली जाणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मायक्रोसाफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्य नाडेला यांची भेट झाली आहे. या भेटीनंतर या प्रचंड गुंतवणुकीची घोषणा या कंपनीकडून करण्यात आली आहे. ही मायक्रोसॉफ्टची आशिया खंडातील आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक असेल. भारतात कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाच्या विस्ताराला मोठी संधी आणि स्थान आहे. भारत हा या तंत्रज्ञानाचे केंद्र बनू शकतो. भारतात या तंत्रज्ञानाला आवश्यक असणारे उच्चशिक्षित मानवबळ मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे भारतात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गुंतवणुकीचा प्रारंभ त्वरित होणार आहे, अशीही माहिती देण्यात आली आहे.

नाडेला यांचा संदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी भेट घेतल्यानंतर सत्य नाडेला यांनी ‘एक्स’वर एक संदेशात्मक पोस्ट प्रसारित केली आहे. या संदेशात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी माझी अत्यंत महत्वाची बैठक झाली. या बैठकीत आम्ही भारताच्या कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाच्या संदर्भातील भविष्याविषयी चर्चा केली. त्यांच्या प्रेरणादायी भाषेसंबंधी मी त्यांचा आभारी आहे. आमची कंपनी भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणार आहे. यामुळे भारतात या तंत्रज्ञानाचा विकास होण्यास मोठा हातभार लागणार आहे, अशा अर्थाचा हा संदेश सत्य नाडेला यांनी नुकताच पोस्ट केला आहे.

गुंतवणुकीचा उपयोग कसा होणार…

या मोठ्या गुंतवणुकीच्या साहाय्याने मायक्रोसॉफ्ट भारतात कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान विकासासाठीआवश्यक अशा पायाभूत सुविधा निर्माण करणार आहे. तसेच भारतातील तंत्रज्ञांना या तंत्रज्ञानाचा सुयोग्य आणि प्रभावी उपयोग करण्याचे प्रशिक्षण देणार आहे. या तंत्रज्ञानाचा विकास करण्यासाठी आवश्यक असणारा कौशल्यविकास करण्यासाठी ही गुंतवणूक उपयोगात आणली जाणार आहे. भारताच्या ‘एआय फर्स्ट’ कार्यक्रमाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी या गुंतवणुकीचा आणि मायक्रोसॉफ्टच्या उच्च संगणकीय तंत्रज्ञानाचा उपयोग होणार आहे.

Comments are closed.